बोर्डा येथील विद्यार्थ्यांना घेऊन मनसेची एसटी डेपोत धडक
चालकाला मारहाणीमुळे 4 दिवसांपासून बससेवा बंद, विद्यार्थ्यांचे हाल
बहुगुणी डेस्क, वणी: शुक्रवारी दिनांक 26 सप्टेंबर रोजी सकाळी बोर्डा येथे विद्यार्थ्याला आणायला गेलेल्या बसचालकाला बोर्डा येथील एकाने मारहाण केली होती. या घटनेपासून बोर्डा येथील बससेवा बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहे. त्यातच आजपासून सराव परीक्षेला सुरुवात झाली. त्यामुळे आज सोमवारी दिनांक 29 सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांनी मनसेचे शहर अध्यक्ष अंकुश बोढे यांच्या नेतृत्त्वात एसटी डेपो कार्यालयात धडक दिली. यावेळी आगार प्रमुखांशी चर्चा करण्यात आली. आगारप्रमुखांनी मंगळवारपासून बससेवा सुरु करणार असल्याचे तोंडी आश्वासन दिले आहे. उद्या दुपार पर्यंत वाट पाहणार अशी भूमिका मनसेने घेतली आहे. त्यामुळे बस सुरु होण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बोर्डा येथे जाण्यासाठी वणी-विरकुंड-बोर्डा ही बसफेरी व घोन्सा मार्गे टपाल बससेवा रोज सुरु होती. दिवसभरात या बसच्या चार फे-या बोर्डा पर्यंत व्हायच्या. मात्र शनिवारी दिनांक 27 सप्टेंबरपासून या बसचा बोर्डा हा थांबा बंद करण्यात आला आहे. आता केवळ विरकुंड व घोन्सा पर्यंतच महामंडळाची बस येते. बोर्डा येथून इयत्ता 5 ते 12 पर्यंतचे सुमारे 100 विद्यार्थी रोज वणी येथे शिक्षणासाठी ये-जा करतात. तसेच गावातील अनेक गोरगरीब लोकांसाठी ही बसच वणीला ये-जासाठीचा पर्याय होता. बस बंद झाल्याने बोर्डावासीयांना ऑटो किंवा खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे.
दुपार पर्यंत वाट पाहणार – अंकुश बोढे
मारहाण करणा-यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा विद्यार्थ्यांशी काहीही संबंध नाही. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान व्हायला नको. आजपासून विद्यार्थ्यांचे सराव पेपर सुरु झाले आहे. बस सुरु करण्याबाबत आगार प्रमुखांशी सकारात्मक चर्चा झाली. त्यांनी उद्या सकाळपासून बस सुरु करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे मनसे दुपार पर्यंत वाट पाहणार आहे.
यावेळी मनसेचे घोन्सा विभाग अध्यक्ष लक्ष्मण उपरे. विभाग संघटक प्रवीण दुमोरे, अहमद रंगरेज, क्रिष्णा निमसटकर, शंकर पिंपळकर, सय्यम ठाकरे, प्रवीण बोथरा यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते व मोठ्या संख्येने बोर्डा येथील विद्यार्थी उपस्थित होते. मनसेच्या अल्टिमेटम नंतर मंगळवारी बस सुरु होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



Comments are closed.