पूरग्रस्त अल्पभूधारक शेतकर्‍यांना उद्या मनसेकडून बियाणे वाटप

वणी मारेगाव व झरीजामणी तालुक्यातील अतिवृष्टीबाधित 1500 अल्पभूधारक शेतकर्‍यांना मनसेच्या वतीने चणा बॅगचे वाटप.. , वसंत जिनिंग सभागृहात भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन

जितेंद्र कोठारी, वणी : महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून वणी उपविभागात राबविण्यात आलेली राजसाहेब ठाकरे पूरग्रस्त अल्पभूधारक शेतकरी दत्तक योजनेतील लाभार्थी शेतकर्‍यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यादीत समाविष्ट वणी, मारेगाव व झरीजामनी तालुक्यातील तब्बल 1500 अल्पभूधारक शेतकर्‍यांना उद्या गुरुवार 3 नोव्हे. रोजी बियाणे व इतर साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. वणी येथील वसंत जिनिंग सभागृहात आयोजित या कार्यक्रमात मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकरसह मनसे प्रवक्ता प्रकाश महाजन, दिलीप बापू धोत्रे व राज्य उपाध्यक्ष आनंदभाऊ एंबडवार उपस्थित राहणार आहे. यावेळी भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजनही करण्यात आले आहे.

यंदा राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडला. अपर वर्धा, निम्न वर्धा व बेंबला प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे वर्धानदीत तीनवेळा महापूर आला. अतिवृष्टी आणि पुरामुळे वणी उपविभागतील वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील शेतकर्‍यांना मोठा फटका बसला. शेतकर्‍यांवर दुबार तिबार पेरणीचे संकट ओढावाले. त्यातच अल्पभूधारक शेतकर्‍यांची अवस्था अत्यंत वाईट झाली. शासनाकडून नुकसान पंचनामा व्यतिरिक्त कोणतीही मदत शेतकर्‍यांना मिळाली नाही. त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी आपल्या सहकार्‍यांसह शेतकर्‍यांच्या दारी पोहचून त्यांची व्यथा जाणून घेतली. एवढेच नव्हे तर मनसेकडून पूरग्रस्त नागरिकांना तात्काळ मदत म्हणून राशन धान्य व बियाणे वाटप करण्यात आले.

त्यानंतर राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून वणी उपविभागात अतिवृष्टीबाधित अल्पभूधारक शेतकर्‍यांना उभारी देण्यासाठी राजसाहेब ठाकरे पूरग्रस्त अल्पभूधारक शेतकरी दत्तक योजना सुरू करण्यात आली. 5 एकरपेक्षा कमी शेतजमीन असलेल्या शेतकर्‍यांना या योजनेत समाविष्ट करण्यात आले. 1 अगस्त 2022 पासून पुरबाधित शेतकर्‍यांची नोंदणी करण्याचे कार्य सुरू करण्यात आले होते. नोंदणी व छाननी अखेर पहिल्या यादीत 1500 शेतकर्‍यांचे नाव जाहीर करण्यात आले. राजसाहेब ठाकरे पूरग्रस्त अल्पभूधारक शेतकरी दत्तक योजनेतील लाभार्थ्यांना गुरुवार 3 नोव्हे. रोजी आयोजित कार्यक्रमात चणा बियाणे बॅग व इतर साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.

बळीराजाला उभारी देण्याचा छोटासा प्रयत्न
वणी, मारेगाव व झरी तालुक्यात पूराने थैमान घातला आहे. जगाचा पोशिंदा संकटात आहे. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना शासनाकडून पाहिजे तशी मदत मिळाली नाही. शेतकरी भयभीत झाला आहे. त्यामुळे ‘सन्माननीय राजसाहेब ठाकरे पूरग्रस्त अल्पभूधारक शेतकरी दत्तक योजनेच्या माध्यमातून अल्पभूधारक बळीराजाला उभारी देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे.
राजू उंबरकर : प्रदेश उपाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

Comments are closed.