दुषित पाण्याचा प्रश्न तात्काळ मिटवा, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन

गेल्या काही दिवसांपासून शहरात नळाद्वारे गढूळ पाणी पुरवठा

विवेक तोटेवार, वणी: शहरात गेल्या काही दिवसांपासून नळाद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत मनसेचे शिवराज पेचे यांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केली. तसेच याबाबत निवेदन दिले. जर येत्या आठ दिवसांत शहरात शुद्ध पाण्याचा पुरवठा न झाल्यास मनसेच्या वतीने ‘खळखट्याक’ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देखील निवेदनातून देण्यात आला आहे. मनसेचे नेते राजू उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले.

वणी शहरात घरोघरी नळांद्वारे दूषित पाणी येत असल्याच्या तक्रारी वणीकरांनी मनसेच्या कार्यालयात राजू उंबरकर यांच्याकडे केल्या होत्या. नदी सभोवतालच्या वॉर्डातील मलमूत्र, गटार व शौचालयाचे पाणी सरळ नदीत सोडण्यात येत असून, ते पाणी फिल्टर प्लांटला येते. वणीचा फिल्टर प्लांट मृत अवस्थेत असल्याची कल्पना असताना सुद्धा त्यात गरजेपेक्षा जास्त क्लोरिन पावडरचा वापर करून पाणी नळाद्वारे नागरिकांच्या घरी पाठवले जात आहे. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे.

या संपूर्ण प्रकारात नगरपालिका जनतेच्या आरोग्याशी खेळत असल्याचा आरोप मनसेच्या वतीने करण्यात आला आहे. वणी शहरातील पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी अतिशय जीर्ण झाली असून, हा सुद्धा एक चिंतेचा विषय आहे. नगरपालिका प्रशासन रोगराईच्या काळात शहर स्वच्छ ठेवण्याऐवजी शहरात दूषित पाणीपुरवठा करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे.

शहराला पाणी टंचाईची झळ बसू नये म्हणून १५ कोटी रुपये खर्चुन वर्धा नदीच्या रांगणा भुरकी डोहातून मोठा गाजावाजा करत शासना मार्फत जलवाहिनी टाकण्यात आली होती. परंतु ही जलवाहिनी सुध्दा वारंवार निकामी ठरत आहे. त्याचे नियोजन अतिशय चुकीच्या पद्धतीने करण्यात आले आहे. म्हणून ती योजना सुद्धा सपशेल अपयशी ठरली आहे. पाणी आले तरी ते वॉटर फिल्टर प्लांटमध्येच येते व वॉटर प्लांट हा मृत अवस्थेत आहे. हा प्रश्न अतिशय गंभीर असून, हा प्रश्न नगरपालिका विभागाने येत्या आठ दिवसांत निकाली काढावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना दूषित पाणी पुरवठ्याच्या संदर्भाने मोठ्या प्रमाणात स्वाक्षरी मोहीम शहरात राबवणार आहे. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकातून देण्यात आली. या सर्व स्वाक्षरी मोहीम अभियानात वणीकर जनतेने मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन मनसेच्या वतीने करण्यात आले आहे.

निवेदन देते वे्ळी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष इरशाद खान, माजी आरोग्य सभापती धनंजय त्रिंबके, शहर उपाध्यक्ष मयूर गेडाम, मनसे वाहतूक सेनेचे जिल्हा संघटक श्याम सिद्दिकी, रुग्णसेवा केंद्र कार्याध्यक्ष अजिद शेख, इरफान सिद्दिकी, लक्की सोमकुवर, शंकर पिंपळकर, संकेत पारखी, मनोज पुराणकर, अयाज खान, रितिक पचारे, कुणाल सोमशेट्टीवार, हिमांशू बोहरा, रुचिर वैद्य, गुड्डू वैद्य उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.