आरोपीला फरार होण्यास मदत करणा-या आई व पत्नीवर गुन्हा दाखल

जितेंद्र कोठारी, वणी: बिना जमानत वॉरंट मधील फरार आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकासोबत आरोपीच्या आई व पत्नीने हुज्जत घालून गोंधळ केला. दरम्यान संधी साधून ताब्यातील आरोपी पळून जाण्यास यशस्वी झाला. सदर प्रकरणी पो.ना. मुकेश करपते यांच्या तक्रारीवरून आरोपी राजू शंकर बुजाडे रा. वार्ड क्रमांक 7, मारेगाव याची आई व पत्नी विरुद्ध वणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

येत्या बकरी ईद सणानिमित्त जास्तीत जास्त वॉरंट बजावण्या संबंधी विशेष मोहीम जिल्हा पोलीस राबवित आहे. वणी पोलीस स्टेशन मधील पो.ना. मुकेश करपते व पो.का. श्रीनिवास गोंडलावार हे 19 जून रोजी रात्री मारेगाव पोलीस स्टेशन हद्दीत वार्ड क्र. 7 मधील राजू बुजाडे यांच्या घरी समन्स घेऊन गेले.

पोलिसांना बघताच आरोपी घराच्या मागील दारातून पळून शेजारी घरात लपून बसला. पोलिसांनी आरोपीला पकडुन घरासमोर आणले असता आरोपीच्या पत्नी व आईने पोलीस कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घालून गोंधळ निर्माण केला. दरम्यान संधी साधून आरोपी घराच्या मागील दारातून पळून गेला.

पो.ना. मुकेश रामकृष्णराव करपते यांच्या फिर्याद वरून वणी पोलीस ठाण्यात आरोपी राजू शंकर बुजाडे, रा. मारेगाव याच्या आई व पत्नी विरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल कलम 225 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.