अमरावती परिमंडळातील ४ कर्मचारी बडतर्फ तर दोघांची कार्यवाही अंतीम टप्प्यात

मुख्यालयी वास्तव्यास नसलेल्या वीज कर्मचा-यांचा घरभाडे गोठविण्याचे आदेश

0
विवेक तोटावार, अमरावती:  विनापरवानगी सातत्याने कामावर गैरहजर असणा-या अमरावती परिमंडळातील ४ तर नागपूर परिक्षेत्रातील तब्बल २५ कर्मचा-यांना महावितरणने बडतर्फ़ केले. तर अमरावती परिमंडळातील २ आणि परिक्षेत्रातील ९ कर्मचाऱ्यांविरोधातील कार्यवाहीची प्रक्रीया अंतिम टप्प्यात असून सध्याचे अवकाळी पावसाचे दिवस बघता वीज ग्राहकांना वीजपुरवठा खंडित झाल्यास त्यांना अधिक काळ अंधारात राहावे लागू नये यासाठी महावितरणच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहावे आणि मुख्यालयी वास्तव्यास नसलेल्या कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता गोठविण्याचे आदेश महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी दिले आहेत.
कामावर सातत्याने गैरहजर असणा-या विदर्भातील  ५२ कर्मचाऱ्यांविरोधात महावितरणने मार्च माहिन्याच्या सुरुवातीस कार्यवाही सुरु केली होती, त्यापैकी तब्बल २५ कर्मचा-यांना बडतर्फ़ करण्यात आले असून यात अमरावती परिमंडलातील ४, अकोला परिमंडलातील १ ‘ चंद्रपूर परिमंडलातील ६, तर नागपूर आणि गोंदीया परिमंडलातील प्रत्येकी ७ कर्मचा-यांचा समावेश आहे. याशिवाय ९ कर्मचा-यांविरोधातील कार्यवाही अंतिम टप्प्यात असून यात अकोला आणि चंद्रपूर परिमंडलातील प्रत्येकी एक, अमरावती परिमंडलातील दोन तर नागपूर परिमंडलातील पाच कर्मचा-यांचा समावेश आहे.
मुख्यालयी वास्तव्यास नसलेल्या कर्मचा-यांचे घरभाडे गोठवा
मागील काही दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे विदर्भातील अनेक भागातील वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना झाल्यात. अनेक वीज कर्मचारी मुख्यालयी वास्तव्यास नसल्याने वीज यंत्रणेत होणारा बिघाड दुरुस्त करण्यात वेळ होत असल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. या तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेता प्रादेशिक संचालकांनी वरील आदेश दिले आहेत. मागील वर्षीही महावितरण प्रशासनाने अनेक कर्मचा-यांचा घरभाडे भत्ता, मुख्यालयीन वास्तव्यास नसल्याच्या कारणास्त्व गोठविला. परिणामस्वरूप अनेकांनी मुख्यालयात वास्तव्यास सुरुवातही केली आहे. यावेळी हा नियम अधिक कठोरपणे राबवून प्रत्येक कर्मचारी हा आपल्या मुख्यालयी वास्तव्यास असल्याची खातरजमा करण्याचे निर्देश भालचंद्र खंडाईत यांनी विदर्भातील पाचही परिमंडलातील मुख्य अभियंते आणि अधीक्षक अभियंता यांना दिले. येत्या तीन दिवसांत याबाबतचा अहवाल प्रादेशिक कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
महावितरण कर्मचा-यांनी मुख्यालयी राहावे यासाठी कंपनी प्रशासन पूर्वीपासूनच आग्रही असून याबाबत सातत्त्याने पाठपुरावाही करणे सुरू असतानाही अनेक कर्मचारी मुख्यालयी वास्तव्यास नसल्याच्या तक्रारी येत आहेत. याबाबत सर्व संबंधितांचीही चांगलीच कानउघाडणी करण्यात आली. कुठल्याही कर्मचाऱ्यांची बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही. ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य द्या, असेही खंडाईत यांनी बजावून सांगितले. वीज वितरण यंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीबाबत हयगय करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असून वीजचोरीचे प्रमाण अधिक असलेल्या भागात वीजचोरीकडे डोळेझाक करणा-यांविरोधातही कठोर कारवाईच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.