वणी तालुक्यात वाघाच्या वावराने शेतकऱ्यांमध्ये दहशत

डब्ल्यूसीएलच्या जागेतील झुडपांमुळे संकट, मनसे आक्रमक

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणी तालुक्यातील निळापूर-गोवारी शिवारात वाघाचा वावर वाढल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वेस्टर्न कोल्ड फील्ड लिमिटेड (डब्ल्यूसीएल) च्या मालकीच्या जागेत वाढलेली झुडपे आणि झाडे यामुळे वन्यप्राण्यांना शेतीपर्यंत येणे सोपे झाले आहे. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी डब्ल्यूसीएलच्या उपक्षेत्रीय प्रबंधकांना निवेदन सादर करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. फाल्गुन गोहोकार यांनी निवेदनात म्हटले आहे की, वाघाच्या वाढत्या वावरामुळे शेतकरी शेतात जाण्यास घाबरत आहेत. यामुळे त्यांच्या जीवितासह उपजीविकेवरही धोका निर्माण झाला आहे. नुकताच एका वाघाने पंढरी कळसकर यांच्या गायीवर हल्ला करून तिला ठार केले. ही घटना भविष्यात मोठ्या दुर्घटनेला निमंत्रण देणारी आहे. गोहोकार यांनी डब्ल्यूसीएलच्या निष्काळजीपणामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप केला आहे.

मनसेच्या निवेदनाची दखल घेत डब्ल्यूसीएलच्या पिंपळगाव उपक्षेत्रीय व्यवस्थापकांनी एक बुलडोझर लावून झुडपे साफ करण्याचे काम सुरु केले आहे. मात्र, गोहोकार यांनी एकच बुलडोझर अपुरे असून अधिक बुलडोझर लावण्याची मागणी केली आहे. मंगळवारपर्यंत सर्व झुडपे साफ न झाल्यास गुरुवारी ग्रामस्थांसह जनआंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. 

या समस्येची गंभीरता लक्षात घेऊन वनविभागाने तात्काळ कारवाई सुरू केली आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी सुजाता विरकर यांनी सांगितले की, शेतकरी आणि ग्रामस्थांना दिलासा देण्यासाठी काही कर्मचारी घटनास्थळी तैनात करण्यात आले आहेत. हे कर्मचारी परिस्थितीवर लक्ष ठेवतील. तसेच, डब्ल्यूसीएलने झुडपे त्वरित साफ केल्यास या समस्येचा कायमस्वरूपी तोडगा निघेल, असेही त्यांनी नमूद केले. यासाठी वनविभागाकडून डब्ल्यूसीएलला पत्र पाठवले जाणार आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या गंभीर परिस्थितीत डब्ल्यूसीएलने त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली आहे. अन्यथा, भविष्यात कोणतीही अप्रिय घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी डब्ल्यूसीएलवर असेल, असा इशारा देण्यात आला आहे. निवेदन सादर करताना योगेश काळे, प्रवीण मांडवकर, प्रवीण कळसकर, भोलेश्वर चिकनकर, प्रतीक बुरडकर, योगेश माथणकर, प्रवीण चटप, हनुमान चिंचोलकर, नानाजी निखाडे, गजानन चिंचोलकर, बंडू आवारी, रामू चटप, शंकर देठे, उज्वला चिंचोलकर, शुभांगी कळसकर, दर्शना कळसकर, किरण चिंचोलकर, योगिता चिंचोलकर, पल्लवी पिंपळखेडे आदी उपस्थित होते.

Comments are closed.