खड्ड्यात गेलाय मुकुटबन ते पाटणबोरी रस्ता

अपघातांत प्रचंड वाढ, प्रशासनाचे दुर्लक्ष

0

सुशील ओझा, झरी: वणीहून मुकुटबन ते आदिलाबाद जाणारा मुख्य मार्ग आहे. मुकुटबन ते पाटणपर्यंत या मार्गावर शेकडो मोठमोठे खड्डे पडलेत. त्यामुळे अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच या मार्गावरील प्रवाशांची त्यामुळे गैरसोय होत आहे. या बाबीकडे प्रशानाचे दुर्लक्ष होत आहे.

सततच्या पावसामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेत. खड्यात पाणी भरून असल्यामुळे कोणता खड्डा किती मोठा आहे याचा अंदाज लागत नाही. सायडिंग मातीने भरल्याने चिखल झाला आहे. त्यामुळे दुचाकीस्वार घसरून पडत आहेत. शेतकऱ्यांना शेतात बैलगाडीसुद्धा घेऊन जाणे कठीण झाले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला खड्डे पडल्याने चारचाकी चालविण्याकरिता मोठी कसरत करावी लागते. गाडीच्या चेंबरला लागून फुटले तर चारचाकीतील संपूर्ण ऑईल सांडून अनेकदा गाड्या बंद पडतात.

रुईकोट जवळील खड्यात मुकुटबन येथील अजिंक्य अक्केवार हा दुचाकीस्वार पडला. तेलंगणातील दुचाकीस्वार आपल्या पत्नी व मुलाला घेऊन त्याच ठिकाणी पडला. रुईकोट येथील खुशाल पातकर, रुपेश भोयर व श्रीनिवास देवांतवार यांनी गाडीवरून पडलेल्या कुटुंबाना उचलले. एक सुज्ञ नागरिक म्हणून तिन्ही युवकांनी हातात पावडा टिकास घेऊन रोडवर खड्ड्यात साचलेल्या पाणी बाहेर जाण्याकरिता मार्ग मोकळा करून पाणी साफ केले. पाणी भरलेला खड्डा दिसू लागला व मार्ग मोकळा केला. या गोष्टीचा बांधकाम विभागांना काहीच देणे-घेणे नसल्याचे चित्र दिसत आहे.

या मार्गाने दुचाकी चालवीत असल्याने अनेक चालकांना कंबरदुखीचे व मानेचे त्रास वाढले आहेत. मुकुटबन ते पाटणपर्यंत संपूर्ण रोडची चाळणी झाली आहे. या मार्गावरील रुईकोट, मांगली व लिंगटी गावाजवळ अर्धा ते एक फुटाचे व २० फूट लांबीच्यावर खड्डे पडलेत. वणी ते पाटणबोरीपर्यंत ३१ किलोमीटरचा संपूर्ण रोड खराब आहे.

याकडे शासकीय बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असून कुंभकर्णी झोपेत दिसत आहे. विधानसभेचे आमदार संजयरेड्डी बोदकुरवार यांनी याकडे लक्ष द्यावे ही मागणी होत आहे. आमदार महोदयांच्या लिंगटी गावाजवळसुद्धा मोठमोठे खड्डे पडलेत. तिथेदेखील लहानमोठे अनेक अपघात घडत असतात. मुकुटबन ते पाटण मार्गावरील पडलेले संपूर्ण खड्डे त्वरित बुजवावे अशी मागणी होत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.