सुशील ओझा, झरी: मुकुटबनवासीयांना शुद्ध पाणीपुरवठा व्हावा, या दृष्टीने उपाययोजना केल्या आहे. यापूर्वी फिल्टर प्लांट सुरू केला असून, पुन्हा दोन शुद्ध फिल्टर प्लांट सुरू करणार आहे. त्यामुळे १२ हजार लोकांना शुध्द पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. .
मुकुटबन ग्रामपंचायतमध्ये १५ सदस्य असून, १५ हजार लोकसंख्या आहे. यावर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे गावकऱ्यांना पाण्यासाठी पायपीट करावी लागली. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने ५-६ बोअरवेल मारून पाणीपुरवठा केला. गावात लग्नकार्य असो की इतर कोणतेही कार्यक्रम, त्या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला. त्यानंतर शुध्द पाणी मिळावे म्हणून एक फिल्टर प्लांटची निर्मिती केली.
मुकुटबन येथे ५ वॉर्ड असून, प्रत्येक नागरिकांना शुद्ध व थंड पाणी कमी पैशात उपलब्ध करून देण्याची हमी देण्यात आली होती. बस स्टँडजवळ शुद्ध फिल्टर थंड पाणी ५ रुपयात २० लिटर उपलब्ध करून दिले. सर्व गावकरी फिल्टर पाण्याकरिता लाइनमध्ये लागून पाणी घेताना दिसत आहे. एकाच ठिकाणी गर्दी होत असल्याने आता गादेवार चौक व मशिदजवळील पाण्याच्या टाकीजवळ दोन पाणी फिल्टर प्लांट लावण्याचा निर्णय घेतला आहे. आता गावातील तीनही शुद्ध पाणी प्लांटवरून जनतेला शुद्ध पाणी मिळणार आहे.
मुकुटबन ग्रामपंचायतच्या नियोजनबद्ध कामे पाहून एक आदर्श ग्रामपंचायत म्हणून ओळख निर्माण झाली आहे. गावातील जनतेला यापूर्वी ३० ते ४० रुपये देऊन पाण्याची कॅन घेऊन पाणी प्यावे लागत होते. परंतु इतर दोन्ही शुद्ध पाणी प्लांटमुळे लोकांना ५ रुपयात २० लिटर पाणी गावकऱ्यांना मिळणार आहे. गावातील प्रत्येक समस्या सोडवणारे सरपंच शंकर लाकडे, उपसरपंच अरुण आगुलवार, सचिव जाधव यांच्यासह सदस्य व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले जात आहे.