अखेर मुंगोली येथील इसमाचा मृत्यू

जळत्या शेकोटीत पेट्रोल टाकल्याचे प्रकरण, आरोपी मोकाट

0

वणी (रवि ढुमणे): नकोडा (घुग्गुस) येथील इसमाने जळत्या शेकोटीमध्ये पेट्रोल टाकून एका दुकानदाराला मारण्याचा प्रयत्न केला होता. काही दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. बुधवारी या दुकानदाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या आरोपी मोकाट फिरत असल्याची माहिती समोर येत आहे.

शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मुंगोली येथील दुकानदार योगीराज मोहजे (47) हे 15 डिसेंबरला संध्याकाळी साडेसात वाजताच्या सुमारास दुकानासमोर शेकोटी लावून बसले होते. गावात पेट्रोल मिळत नसल्याने त्यांनी आपल्या दुचाकीत व बॉटलमध्ये पेट्रोल आणून ठेवले होते. बॉटल दुकानाच्या काउंटरवर ठेवली व योगीराज थंडीत शेकोटीजवळ बसले. मुलगा मेघराज हा घरात जेवण करत होता.

दरम्यान घुग्गुस(नकोडा) येथील हाजी शेख सरवरचा भाऊ वाजीद हा दुकानासमोर आला. त्याने योगीराज यांना दुकानात दिसलेली पेट्रोलची बॉटल मागितली. योगीराजने पेट्रोल देण्यास नकार दिल्याने वाजीद भडकला व त्याने शिवीगाळ करीत “मी कोण आहे माहीत नाही काय?” असे चढ्या आवाजात उत्तर दिले आणि दुकानाच्या काउंटरवर असलेली पेट्रोलची बॉटल उचलली व शेकोटीत टाकली.

पेट्रोल शेकोटीत पडताच मोठा भडका झाला त्यात योगीराज भाजल्या गेले. शेजारी व घरातील मंडळी धावत आली आणि योगीराजच्या अंगाला लागलेली आग विझवून त्याला तात्काळ ऍम्बुलन्सने चंद्रपूरला उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर हाजी गावात दाखल झाला परंतु ज्या स्कारपीओ वाहनाने आला ते वाहन त्याला तेथेच सोडून जावे लागले.
ही घटना घडताच ग्रामस्थांनी वाजीदला घेरले होते. पण तो तेथून निसटण्यास यशस्वी झाला.

या घटनेची तक्रार योगीराजचा मुलगा मेघराज याने शिरपूर पोलिसात दिली. त्यावरून वाजीद शेख विरुद्ध भारतीय दंड विधान कलम 307 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतू गेल्या 13 दिवसापासून उपचार घेत असलेल्या योगीराज मोहजे याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

अद्याप तरी हा प्रकार करणारा व्यक्ती मोकाटच असल्याची चर्चा आहे. गेल्या 15 तारखेला हा अनुचित प्रकार घडला असताना शिरपूर ठाणेदारांनी यातील आरोपीला जणू पाठबळच दिल्याचे दिसून येत आहे. आता योगीराज यांचा मृत्यू झाला असताना पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली की काय असे अनेक प्रश्न उपस्थित होते आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेदार सागर इंगोले करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.