शेवटच्या घटकाच्या उन्नतीतच देशाची खरी प्रगती – मुनगंटीवार
वणीत भाजपतर्फे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन
पुरुषोत्तम नवघरे, वणी: एकात्म मानववादाचे प्रणेते पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी वणी विधानसभा कार्यकर्ता मेळावा झाला. गुरुवारी दिनांक 25 सप्टेंबर रोजी शहरातील एस.बी. लॉन येथे हा कार्यक्रम पार पडला. या मेळाव्यात जनसेवेचा संकल्प करताना सुधीर मुनगंटीवार यांनी कार्यकर्त्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. शेवटच्या घटकाच्या उन्नतीतच देशाची खरी प्रगती आहे. त्यामुळे शेवटच्या पंक्तीत बसलेल्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचा संकल्प करा, असे आवाहन त्यांनी मार्गदर्शन करताना केले.
कार्यक्रमात चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक उईके, माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार, ललिता बोदकुरवार, माजी जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, दिनकर पावडे, विजय पिदुरकर, महादेव खाडे, संजय पिंपळशेंडे, रवि बेलूरकर, कुणाल चोरडीया, संतोष डंभारे, श्रीकांत पोटदुखे, मंगलाताई पावडे, उमाताई पिदुरकर, जयमाला दर्वे, मिराताई पोतराजे, प्रदीप जेऊरकर, निलेश चौधरी, अविनाश लांबट यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कामगार संघटनेचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मेळाव्यात बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या विचारांना जीवनध्येय मानून वणी विधानसभा क्षेत्रात कार्य करण्याचा ठाम निश्चय प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी करावा. शेवटच्या पंक्तीत बसलेल्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याची ताकद आपल्यात असली पाहिजे. जनसेवेचे व्रत स्वीकारूनच आपण खऱ्या अर्थाने त्यांच्या विचारांचे पाईक ठरू शकतो.”
ते पुढे म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत मी उभा असताना प्रत्येक कार्यकर्त्याने मनापासून मेहनत घेतली, त्यासाठी मी सर्वांचा ऋणी आहे. भारतीय जनता पक्षाची विचारसरणी आणि मूल्ये काळानुसार बदलणार नाहीत. पक्षाचा आत्मा बनून कार्य करणारे कार्यकर्तेच भाजपाची खरी ताकद आहेत.
वणी विधानसभेतील प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्ता जनतेची सेवा करण्यासाठी पुढे येईल, याबाबत मला पूर्ण विश्वास आहे. या संकल्पयात्रेत मीही पूर्ण शक्तीने सर्वांच्या पाठीशी उभा आहे.”देशाची खरी प्रगती विकासाच्या आकडेवारीत नव्हे, तर शेवटच्या घटकातील गरिबांच्या उन्नतीतून मोजली जाते, असे सांगून त्यांनी अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण आणि रोजगार या मूलभूत गरजांची पूर्तता करण्यासाठी देशाची संपत्ती खर्च होते का, हे पाहणे महत्त्वाचे असल्याचे नमूद केले.
संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे मानले आभार
2014 आणि 2019 मध्ये वणी विधानसभेचे नेतृत्व केलेले संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी मतदारसंघाची मनापासून सेवा केली आहे. त्यामुळे प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ‘वणी नगरपरिषद जिंकणारच’ या संकल्पनेची मशाल मनामनात प्रज्वलित करावी.
वणी विधानसभा क्षेत्रातील कोणतेही काम असो किंवा विधानसभेत प्रश्न मांडण्याची वेळ असो, त्यासाठी मी पूर्ण ताकद आणि प्रयत्न पणाला लावीन, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी व समर्थक उपस्थित होते.



Comments are closed.