मुर्ती ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा

रस्त्याचे काम पूर्ण न झाल्याने ग्रामस्थांमध्ये संताप

0

बहुगुणी डेस्क, वणी: रस्त्यासाठी ग्रामस्थांनी शासनदरबारी वेळोवेळी निवेदन दिले. मात्र त्यांच्या निवेदनाला प्रशासनाने केराची टोपली दाखवल्याने मुर्ती गावातील ग्रामस्थ संतप्त झाले असून त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत होणा-या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. यासंबंधी मुर्ती वासियांनी दिनांक 25 सप्टेंबरला बुधवारी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर केले.

वणी तालुक्यातील मुर्ती या गावातील रहिवाशांनी मुर्ती ते पाथरी हा 90 मीटरचा पायदान रस्ता पक्का करण्याबाबत, बोरी ते मुर्ती हा 3 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण तसेच बोरी ते मुर्ती रोडवरील नाल्यावरील पुलाची उंची वाढवण्याबाबत वेळोवेळी प्रशासनाला निवेदन दिले. तसेच याबाबत लोकप्रतिनिधींकडेही अर्ज व निवेदन सादर करण्यात आले होते. मात्र आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत मुर्ती येथील रहिवाशांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे.

सदर गावासाठी संपर्क होण्यासाठी मुर्ती ते पाथरी व बोरी ते मुर्ती असा रस्ता होणे गरजेचे होते. पावसाळ्यात लोकांना याचा त्रास होतो. पाऊस अधिक आल्यास सात ते आठ दिवस सदर रस्ता बंद असतो. दरम्यान गावात एखादा रुग्ण असल्यास त्याला हाल सोसावे लागतात. शिवाय यामुळे रुग्णांचे बरेवाईट होण्याचा धोकाही संभवतो असा उल्लेखही मुर्ती वासियांनी निवेदनात केला आहे.

निवडणुकीच्या काळात कोणताही उमेदवार किंवा पक्षाचे कार्यकर्ते प्रचारासाठी आल्यास त्यांना गावात प्रवेश करू दिला जाणार नाही. तसेच जो व्यक्ती मत मागण्यासाठी येणार त्याची अडवणूक केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. हे टाळण्यासाठी प्रशासनाने या कडे लक्ष द्यावे असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर संबाशिव मत्ते, विजय दुर्गे, राजू दुर्गे, शंकर झाडे, खुशाल जिवने, विजय सातपुते, पांडुरंग मत्ते, यांच्या सही आहेत.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.