जितेंद्र कोठारी, वणी: पाणी कराच्या स्वरूपात नागरिकांकडून वसूल करण्यात आलेले तब्बल 10 लाख रुपये वसुली कंत्राटदारांनी नगर परिषद कोषागारमध्ये जमा न करता परस्पर ‘छुमंतर’ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वणी न.प. चे अध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी खुद्द शुक्रवारी मुख्याधिकारी यांना निवेदन दिल्यानंतर हा गैरप्रकार उघडकीस आला.
प्राप्त माहितीनुसार वणी नगर परिषद अंतर्गत पाणी कर वसुलीचे कार्य अंकित कोयचाडे नावाच्या कंत्राटी कर्मचारी यांना देण्यात आले आहे. सदर कर्मचाऱ्यांनी एप्रिल ते सप्टें. 2020 पर्यंत नागरिकांकडून वसूल केलेली रक्कम व न.प. कोषागारमध्ये जमा करण्यात आलेली रक्कम यात प्रथमदर्शनी तफावत आढळून आलेली आहे. ही तफावत सुमारे नऊ लाख रुपयांपर्यंत आहे.
न.प. पाणी पुरवठा विभागाने 22 ऑक्टो. रोजी आढावा बैठक घेतली होती. तेव्हा रोखपालाने सादर केलेल्या रजिस्टर व दैनिक वसुली रजिस्टरच्या रक्कमेत या तफावत आढळून आली. रजिस्टरच्या पडताळणीतुन लक्षात आले की पाणी कर वसुली कर्मचारी अंकित कोयचाडे कडून एप्रिल ते ऑक्टो.2020 पर्यंत वसूली केलेल्या रक्कमेपैकी अंदाजे 9 लाखापेक्षा जास्त रक्कम नगर परिषदच्या खजिन्यात जमाच केली नाही.
याबाबत नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी परिषद मुख्याधिकारी यांना पत्र देऊन सखोल चौकशी करण्याची सूचना केली. त्या अनुषंगाने 4 सदस्यीय चौकशी समितीचे गठन करून एप्रिल ते ऑक्टो. 2020 पर्यंत वसुली व जमा रक्कमेची तफावत शोधण्याचे कार्य सुरू करण्यात आले आहे. समिती आर्थिक वर्ष 2019- 20 च्या ऑडिट रिपोर्टची पडताळणीसुद्दा करणार आहे. चौकशी दरम्यान घोटाळ्याची रक्कम 9 लाखा पेक्षा जास्त वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
नगर परिषद रोखपालाची होणार चौकशी
कराच्या स्वरूपात नगर परिषदला मिळालेली रक्कम आणि कोषागारमध्ये जमा होणारी रक्कमेचा हिशोब ठेवण्याची जवाबदारी रोखपालची असते. मागील सहा महिन्यांपासून किंवा त्यापूर्वी पासून सुरू असलेला हा घोटाळा रोखपाल पचारे यांच्या लक्षात का नाही आले ? लाखोंच्या अफरातफतीच्या या प्रकरणात रोखपालाचा सहभाग तर नाही याबाबत ही समिती चौकशी करणार आहे.
दोषी कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हा नोंदविणार
नगर परिषद अंतर्गत झालेल्या या घोटाळ्याची बारकाईने चौकशी केली जाणार आहे. चौकशीनंतर अपाहर करण्यात आलेल्या रक्कमेचा एकूण आकडा समजेल. चौकशीत दोषी आढळलेल्या व्यक्तिविरुद्ध वणी पो.स्टे. मध्ये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल.
तारेंद्र बोर्डे: नगराध्यक्ष, न.प.वणी
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)