बनावट कागदपत्रे तयार करुन प्लॉटची परस्पर विक्री

नागपूर येथील महिलेसह चौघांवर गुन्हा दाखल

जितेंद्र कोठारी, वणी: प्लॉटधारकाच्या आधारकार्डवर दुसऱ्या व्यक्तीचा फोटो लावून व खोट्या सह्या करुन प्लॉटची परस्पर विक्री करण्यात आली. याबाबत करण्यात आलेल्या तक्रारीवरून नागपूर येथील एका महिलेसह चौघांवर वणी पोलीस ठाण्यात 3 नोव्हेंबर रोजी विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आले आहे.

फिर्यादी अनिरुद्ध नरेंद्र रावत (42) रा.गणपती वार्ड, काच मंदिर जवळ, आर्वी जि. वर्धा यांनी वणी तालुक्यातील मौजा गणेशपुर गाव क्र. 79 हद्दीत रामदेव बाबा वारको डेव्हलपर्स कडून सर्व्हे नंबर 5/2 मधील निवासोपयोगी खुले प्लॉट क्र. 27 व 28 खरेदी केले. प्रत्येकी 127.50 चौरस मीटरच्या दोन्ही प्लॉटची वणी येथील दुय्यम निबंधक कार्यालयात दि. 13 ऑगस्ट 2013 रोजी 3 लाख 6 हजार रुपयात खरेदी नोंद करण्यात आली. 

प्लॉट खरेदीनंतर अनिरुद्ध रावत गेले काही वर्ष वणीत आले नाही. फिर्यादी यांना पैशाची गरज भासली म्हणून त्यांनी वणी येथील प्लॉट विकण्याचा विचार केला. त्या उद्देशाने 2020 मध्ये सदर प्लॉटचे सातबारा काढले असता प्लॉट क्र. 27 हा संदीप सुभाष जूनघरे व प्लॉट क्र. 28 विनोद मनोहर किडीले यांच्या नावावर असल्याचे त्यांना आढळून आले. याबाबत रावत यांनी दुय्यम निबंधक कार्यालयातून अधिक माहिती काढली. तेव्हा त्याच्या मालकीचे दोन्ही प्लॉट दि. 2 मार्च 2016 रोजी संजना प्रदीप देशमुख (31) रा. दिघोरी नाका, संगम नागपूर हिने रावत यांचे बनावट आधारकार्ड तयार करुन व खोट्या सह्या करुन आपल्या नावावर करुन घेतल्याचे समजले.

एवढंच नाही तर आरोपी महीलेनी दोन्ही प्लॉट स्वतचे असल्याचे भासवून दि 6 एप्रिल 2016 मध्ये वणी येथील दोघांना प्लॉट विकले. त्यात प्लॉट क्र.27 संदीप सुभाष जूनघरे (37) महाराष्ट्र बँक जवळ वणी व प्लॉट क्र. 28 विनोद मनोहर किडीले (40) रा. साधनकरवाडी यांना विकला. आरोपी यांनी संगनमताने त्याच्या मालकीचे जमीन प्लॉट क्षेत्रफल 255 चौ.मी. बनावट दस्तऐवज व खोट्या सह्या करून परस्पर विकून फसवणूक केल्याप्रकरणी वणी पोलिसांनी संजना प्रदीप देशमुख (31) रा. दिघोरी नाका, संगम नागपूर, संदीप सुभाष जूनघरे (37) महाराष्ट्र बँक जवळ वणी व 2 इसम असे चौघांविरुद्ध कलम 34, 420, 467 व 471 भादवी अन्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास सुरू आहे. 

हे देखील वाचा; 

बारमधील महिला कामगारसोबत ग्राहकाचे असभ्य वर्तन

आजी माजी आमदारांच्या गावात जय सहकारचे जोरदार शक्ती प्रदर्शन

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.