वणी नगर परिषदकडून शासकीय प्रोटोकॉलचे उल्लंघन

वॉटर एटीएम फलकावर मुख्यमंत्री, खासदार व पालकमंत्र्यांचा फोटो नसल्याची शिवसेनेची तक्रार

0

जितेंद्र कोठारी, वणी: येथील प्रगतीनगर भागात वॉटर एटीएमच्या उदघाटन प्रसंगी नगर परिषद प्रशासनाकडून शासकीय प्रोटोकॉलचे उल्लंघन करण्यात आले. याबाबत शिवसेना शहर प्रमुख राजू तुराणकर, युवासेना उप जिल्हा अधिकारी अजिंक्य शेंडे व माजी शहर प्रमुख ललित लांजेवार यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे लेखी तक्रार केली आहे.

खनिज विकास निधीतून मंजूर वॉटर एटीएम सयंत्रचे उदघाटन शनिवारी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. वॉटर एटीएमच्या फलकावर पंतप्रधान नरेंद्र मोदीसह माजी खासदार हंसराज अहिर, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांची फोटो लावण्यात आली. मात्र शासकीय राजशिष्टाचार कायद्यानुसार मुख्यमंत्री, पालकमंत्री व खासदार यांची फोटो व नाव असणे गरजे असताना हेतुपुरस्सर त्यांची फोटो व नाव उदघाटन फलकावर टाकण्यात आले नाही.

शासकीय निधीतून होणाऱ्या कामाचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळयात लोकप्रतिनिधी याना निमंत्रित करणे, फलकावर नाव व फोटो टाकणे इत्यादी प्रोटोकॉलचे पालन होत नसल्याची तक्रार खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांचेकडे केली होती. खासदारांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी यांनी 22 जुलै 2021 रोजी वणी नगर परिषदला पत्र पाठवून शासकीय कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेबाबत राजशिष्टाचारचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश दिले होते.

मात्र 21 ऑगस्ट रोजी प्रगतीनगर येथे वॉटर एटीएमच्या लोकार्पण प्रसंगी शासकीय प्रोटोकॉल व जिल्हाधिकारी यांचे आदेश पायदळी तुडवीत एका राजकीय पक्षाने श्रेय घेण्याचा डाव खेळल्याचे आरोप शिवसेनेने केले आहे.

राजशिष्टाचारचे उल्लंघन केल्याप्रकरणी नगर परिषद मुख्याधिकारीवर कार्यवाही करण्याची मागणी राजू तुराणकर यांनी केली आहे. तसेच लावलेले फलक काढून प्रोटोकॉलनुसार फलक लावण्यात यावे, अन्यथा शिवसेना आपल्या पद्दतीने आंदोलन करणार. असा इशाराही तक्रारीत देण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.