नगर परिषद प्रशासन सुस्त, कर्मचारी मस्त, जनता त्रस्त

जितेंद्र कोठारी, वणी: मागील 15 महिन्यांपासून प्रशासक राज असलेल्या वणी नगर परिषदेचा भोंगळ कारभार काही केल्या संपताना दिसत नाही. अद्यापही वणीकरांना शुद्ध पाणी मिळत नाही, अनेक रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे, तर अनेक रस्त्यावरचे पथदिवे बंद अवस्थेत आहे. प्रशासक आणि मुख्याधिकारी यांचे नगर परिषद कर्मचाऱ्यांवर कोणत्याही प्रकारचे वर्चस्व उरलेले दिसत नाही. त्यामुळे प्रशासन सुस्त, नगर परिषदेचे कर्मचारी मस्त आणि वणीकर जनता त्रस्त झाली आहे. वणी नगर परिषदेतील सगळा कारभार अस्तव्यस्त असून लहान लहान कामासाठी नागरिकांची हेळसांड होत आहे.

Podar School 2025

वणी शहरातील तब्बल 80 हजार जनतेला पिण्याचे शुद्ध पाणी मिळावं यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून वर्धा नदीवरून पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. मात्र प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरिक निर्गुडा नदीतील गढूळ पाणी पिण्यास मजबूर आहे. सार्वजनिक विद्युत व्यवस्था (स्ट्रीट लाइट) पूर्णपणे कोलमडली असून पथदिवे दिवसा सुरु आणि रात्री बंद अशी स्थिती निर्माण झालेली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

शहरातील नांदेपरा रोडसह अनेक रस्त्यांवर मोठे मोठे खड्डे पडलेले आहे. या मार्गावर अपघाताची शक्यता असताना रात्रीच्या वेळी संपूर्ण पथदिवे बंद राहत आहे. नांदेपेरा रोड, डी.पी. रोड, बँक कॉलोनी, लक्ष्मीनगर या भागात स्ट्रीट लाईट बंद राहत असल्याबाबत अनेकदा न. प. मुख्याधिकारी यांना तक्रार करण्यात आली. मात्र त्यावर अद्यापही कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

नगर परिषद आरोग्य विभागाकडुन नागरीकांच्या आरोग्याशी निगडीत कोणत्याही संदर्भात गांर्भीयाने दखल घेतली जात नाही. शहरात स्वच्छ भारत अभियानाचे तीन तेरा वाजविण्यात आले असून नगर परिषदच्या कार्यालयाच्या आजूबाजूला तसेच शहरात विविध ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे आहे. एकीकडे महाराष्ट्र व केंद्र सरकार स्वच्छता अभियान राबविण्यासाठी लाखो करोडो रुपये खर्च करीत असून येथील नगरपरिषद स्वच्छता अभियानाला हरताळ फासत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Comments are closed.