झरी नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा… ज्योती बीजगूनवार नगराध्यक्ष
काँग्रेसला फटका... पहिल्यांदाच जंगमला मिळणार सत्तेत स्थान
प्रतिनिधी, झरी: झरी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या ज्योती संजय बीजगूनवार या निवडून आल्या आहेत. त्यांनी काँग्रेसच्या सुजाता अनमुलवार यांचा पराभव केला. विशेष म्हणजे झरी सहीत मारेगाव नगरपंचायतीवरही शिवसेनेने भगवा फडकवला आहे. तर पहिल्यांदाच जंगोम दलाला सत्तेत स्थान मिळणार आहे.
झरी नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेना व काँग्रेसला प्रत्येकी 5 जागा मिळाल्या होत्या. तर जंगोम दलाला 4 जागा मिळाल्या होत्या. भाजप, मनसे व अपक्षाला प्रत्येकी 1 जागांवर समाधान मानावे लागले. स्पष्ट बहुमत न मिळाल्याने या नगरपंचायतीमध्ये कुणाची सत्ता येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. वरिष्ठ पातळीवर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला होता. मात्र शिवसेनेने काँग्रेसला दूर ठेवत स्थानिक जंगम दलाला सोबत घेतले.
काही दिवसांआधी जंगोम दलाच्या नगरसेवकांना घेऊन सेना-जंगोमचे नगरसेवक महाराष्ट्र दर्शनाला गेले होते. त्यामुळे काँग्रेसचा पराभव होणार अशी चर्चा रंगली होती. अखेर मतदानाच्या दिवशी शिवसेनेने काँग्रेसला धोबीपछाड देत नगराध्यक्ष पद काबिज केले. विशेष म्हणजे याचा वचपा काढण्यासाठी काँग्रेसने मारेगाव नगरपंचायतीमध्ये सेनेला दूर ठेवत इतर पक्षाची मदत घेतली. मात्र तिथे देखील त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. दोन्ही नगरपंचायतीवर भगवा फडकल्याने सध्या परिसरात विश्वास नांदकर यांच्या मुसद्दी खेळीची चांगलीच चर्चा होत आहे.
तळागाळातील लोकांनाही सत्तेत प्रतिनिधित्व – विश्वास नांदेकर
तळागाळातील लोकांना सत्तेत प्रतिनिधित्व देण्याचे आमचे नेतृत्त्व मा. उद्धव ठाकरे यांचे धोरण आहे. झरी तालुका हा आदिवासी बहुल तालुका आहे. जंगम दलालाही सत्तेत प्रतिनिधित्व मिळावं यासाठी आम्ही जंगमसोबत युती करण्याचा निर्णय घेतला. झरी ही सर्वात लहान नगर पंचायत आहे. या नगरपंचायतीचा कालापालट करून एक मॉडल नगरपंचायत म्हणून राज्यात ओळख निर्माण करणे हे आमचे 5 वर्षातील ध्येय आहे.
– विश्वास नांदेकर, जिल्हा प्रमुख शिवसेना व माजी आमदार
नगराध्यक्षपद शिवसेनेकडे, उपाध्यक्ष व एक सभापतीपद जंगोम दल तसेच एका वर्षासाठी नगराध्यक्ष पद व एक स्वीकृत नगरसेवक देण्याचा फॉर्म्युला ठरल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. शिवसेनेचा उमेदवार निवडून येताच शिवसैनिक व जंगोम दलाच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून व फटाक्याची आतषबाजी करीत आनंद व्यक्त केला. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर, संजय देरकर, सुनिल कातकडे, संजय निखाडे, चंद्रकांत घुगुल, संजय बीजगूनवार यांच्यासह शेकडो शिवसैनिक व जंगोम दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
हे देखील वाचा:
मारेगाव नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला, डॉ. मनिष मस्की नगराध्यपदी….
Comments are closed.