मारेगाव नगरपंचायतीमध्ये भाजपची उपाध्यक्ष, ईश्वरचिठ्ठीने निकाल

निवडणुकीत घडल्या नाट्यमय घडामोडी, ऐन वेळी नगराध्यक्ष अनुपस्थित... भाजपचा 'गेम' करण्याचा सेनेचा प्लान फसला?

तालुका प्रतिनिधी, मारेगाव: मारेगाव नगरपंचायतीमध्ये सकाळी नाट्यमय घडामोडीनंतर शिवसेनेने बाजी मारत नगराध्यक्ष पद काबिज केले. अशाच नाट्यमय घडामोडी दुपारी उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठीही दिसून आल्या. ऐन मतदानाच्या वेळी खुद्द नगराध्यक्षच अनुपस्थित राहिल्याने दोन्ही उमेदवारांना समान मते मिळाली व ईश्वरचिट्ठीने याचा निकाल लागला. भाजपच्या हर्षा अनुप महाकुलकर या विजयी झाल्या. त्यांनी मनसेच्या शेख अंजुम यांचा पराभव केला. दोन्ही उमेदवारांना समान 7 मते मिळाली. दरम्यान भाजपच्या मदतीने नगराध्यक्ष पद मिळवल्यानंतर भाजपचाच ‘गेम’ करण्याच्या विचारात सेना होती. मात्र डाव फसला अशी चर्चा स्थानिक राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

काँग्रेसपुरस्कृत उमेदवाराकडे नगराध्यक्षपद व मनसेकडे उपाध्यक्षपद असा फॉर्म्युला काँग्रेसच्या गटात ठरला. मात्र नगराध्यक्ष पदापासून काँग्रेसला दूर ठेवण्यासाठी शिवसेनेने भाजपसोबत युती केली. काँग्रेसचे दोन नगरसेवक फोडले. मतदानाच्या वेळी काँग्रेसचे दोन नगरसेवक गैरहजर राहिले. त्यामुळे शिवसेनेने 8 विरुद्ध 7 मतांनी विजय मिळवला. नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेला भाजपच्या 4 नगरसेवकांनी पाठिंबा दिला. त्यामुळे उपाध्यक्षपद भाजपकडे जाणार याची केवळ औपचारिकता बाकी होती. मात्र या 4-5 तासांमध्ये प्रचंड राजकीय घडामोडी घडल्या.

दुपारी 4 वाजता वाजता उपाध्यक्ष पदासाठी मतदान होते. भाजपतर्फे हर्षा अनुप महाकुलकर या उमेदवार होत्या तर त्यांच्या विरोधात मनसेच्या शेख अंजुम शेख नबी या उमेदवार होत्या. त्यांना काँग्रेस, राष्ट्रवादी व एका अपक्षाचा पाठिंबा होता. तर भापजच्या उमेदवाराला सेनेचा पाठिंबा होता. मात्र मतदानाच्या वेळी सभागृहात काँग्रेसचे दोन नगरसेवक व सकाळीच नगराध्यक्षपदी विराजमान झालेले सेनेचे डॉ. मनिष मस्की हे गैरहजर राहिले. त्यामुळे दोन्ही बाजूने सात-सात सभासद सभागृहात उपस्थित होते. त्यामुळे दोन्ही उमेदवारांना समान मते मिळाली.

अखेर समान मतामुळे ईश्वरचिट्ठी काढण्यात आली. त्यात हर्षा अनुप महाकुलकर या विजयी झाल्या. त्यांना उपाध्यक्ष म्हणून घोषीत करण्यात आले. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. उपाध्यक्ष पदाच्या निवडणुच्या वेळी वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार हे देखील उपस्थित होते.

भाजपचा ‘गेम’ करण्याचा सेनेचा प्लान फसला?
नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना व उपाध्यक्षपद भाजपकडे असा फॉर्म्युला ठरला होता. त्यानुसार भाजपच्या चार नगरसेवकांची मदत घेत शिवसेनेने नगराध्यक्ष पद काबिज केले. भाजपच्या मदतीने नगराध्यक्ष पद मिळवल्यानंतर भाजपचाच ‘गेम’ करण्याच्या विचारात सेना होती. दुपारी मतदानाच्या वेळी शिवसेनेचे एक नगराध्यक्षच सभागृहात अनुपस्थित राहिले. त्यामुळे भाजपचा विजय धोक्यात आला. मात्र ईश्वरचिट्ठीने त्यांना तारले. शिवसेनेने भाजपचा ‘गेम’ करण्याचा संपूर्ण प्लान केला होता. मात्र त्यांचा प्लान फसला अशी चर्चा मारेगावात होत आहे.

काँग्रेस कार्यालयात शांतता
काँग्रेसचा नगराध्यक्ष होणार हे जवळपास निश्चित होते. मात्र दोन नगरसेवक फुटल्याने काँग्रेसच्या तोंडाशी आलेला घास हिसकवला गेला. त्यामुळे मारेगावातील काँग्रेस कार्यालयात शांतता पसरलेली होती. अनेकांच्या चेहऱ्यावर याची नाराजी स्पष्टपणे जाणवत होती. आपल्याच माणसांनी आपला घात केला, अन्यथा सत्ता आपलीच असती अशी संतप्त प्रतिक्रिया एका काँग्रेस नेत्याने दिली. दरम्यान मनसेला देखील उपाध्यक्ष पदाची आशा होती. मात्र ऐनवेळी काँग्रेसच्या फसलेल्या राजकीय डावपेचाचा फटका मनसेलाही बसला व मनसेचीही निराशा झाली.

दे देखील वाचा:

मारेगाव नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला, डॉ. मनिष मस्की नगराध्यपदी….

झरी नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा… ज्योती बीजगूनवार नगराध्यक्ष

Comments are closed.