जितेंद्र कोठारी, वणी: सध्या सोशल मीडियाच नाही तर राज्यभर नागपूर मेट्रो रेलमध्ये आयोजित पार्टीची चांगलीच चर्चा रंगत आहे. तृतीय पंथीयांचा डान्स, दुसऱ्या कोचमध्ये चाललेला जुगार आणि डान्सवर पैशाची झालेली उधळण यामुळे केवळ नागपूरच नाही तर संपूर्ण राज्य़भर याची चर्चा होत आहे, मात्र त्यातच या पार्टीचे वणी कनेक्शन उघड झाल्याने परिसरात एकच खमंग चर्चा रंगत आहे. त्यातील काहींचे चेहरे व्हायरल व्हिडीओत दिसत असल्याने त्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे.
मूळचे वणी येथील रहिवासी आणि हल्ली नागपूर येथे वास्तव्यास असलेले व बड्या राजकीय पक्षाच्या नेत्याशी कायम उठबस असणाऱ्या हस्तीचा गुरुवारी दिनांक 21 जानेवारी रोजी वाढदिवस होता. ते जरी नागपूरात राहत असले तरी त्यांचे वणीत नेहमी येजा सुरू असते. त्यामुळे वणीतही त्यांचा चांगलाच मित्रपरिवार आहे. या नेत्याचा दरवर्षीच दणक्यात वाढदिवस होतो. मात्र या नेत्यानेही दरवर्षीचं ‘शिरा-भाता’चं आवतण देण्यापेक्षा या वेळी मस्तीचे ‘शिखर’ गाठण्यासाठी काहीतरी ‘तुफानी’ करते है म्हणत बर्थ जे बॉयने चक्क मेट्रोचे 2 कोचच बुक करत आगळ्या वेगऴ्या पार्टीचे आयोजन केले.
मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी वणीतून राजकीय, सामाजिक क्षेत्रातील चांगलेच नामवंत व्यक्ती आपापल्या गाडीने तर ज्यांच्याकडे गाडी नव्हती ते दुसऱ्यांच्या गाडीत ऍडजस्ट होत “चलो नागपूर” म्हणत मित्राच्या वाढदिवसाला पोहोचले.
मेट्रो पार्टीत सहभागी पाहुण्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी तृतीयपंथीयानाही खास बोलाविण्यात आले होते. धावत्या मेट्रोच्या एका डब्यात तृतीयपंथीयांच्या ठुमक्यावर चक्क 500 रुपयांच्या नोटांचा पाऊस पडत होता. तर मेट्रोच्या दुसऱ्या कोचमध्ये दोन हजारांच्या नोटांसह तीन पत्तीचा खेळ पूर्ण रंगात आला होता.
पैसे उधळणाऱ्याची चांगलीच चर्चा
या ‘जन्नत’ची सैर करण्यासाठी केवळ तरुणच नाही तर बुर्जग माणसंही ‘राजा’ होऊन मस्तीत रंगले. पक्ष विसरून सावळे-गोरे भेद विसरून पार्टीत सारेच सामिल होऊन ‘टल्ली’ झाले. एकमेकांची ‘जय’ करत, झिंगलेल्यांना ‘कुली’ बनून सावरत पार्टी सुरू होती. कोणतीही देर न करता राजकीय क्षेत्रातील ‘भाऊ’लोक्स यात मोठ्या संख्येने सहभागी झालेत. मात्र यात बाजी मारली ती पैसे उधळणाऱ्या भाऊने ! या व्यक्तीने ये दिल मांगे ‘मोर’ मस्ती म्हणत चक्क तृतीय पंथीयावर नोटा उधळत वणीकरांचे नाव ‘उज्ज्वल’ केले.
मेट्रो मस्तीनंतर घरात ठेवलेल्या मुख्य पार्टीमध्ये पाहुण्यांनी “खाण्या-पिण्या” चा आस्वाद घेतला. सर्व काही शांतपणे निपटले. वणी व इतर ठिकाणाहून आलेले मित्र रात्री उशिरा परत निघाले.
मात्र दुसऱ्या दिवशी मेट्रो पार्टीचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. आणि त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या अनेक मराठी वृत्त वाहिन्यांनी मेट्रो रेल पार्टीची बातमी प्रसारित केली. सार्वजनिक परिवहनच्या मेट्रो रेलमध्ये शराब, शबाब आणि जुगारमुळे अनेकांची भुवया उंचावली. नागपूर मेट्रोच्या अधिकाऱ्यांसह पार्टी आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होऊ लागली.
इकडे वणी शहरात “ते” महाभाग कोण? या विषयावर कानाकोपऱ्यात खमंग चर्चेला पेव फुटले आहे. तर बर्थडे बॉयच्या अनेक मित्रांनी “तो मी नव्हेच”ची भूमिका घेतली आहे.
हे देखील वाचा: