पैशाने कार्यकर्ते विकत घेता येत नाही: जयंत पाटील

वणीत राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा संपन्न

0

विवेक तोटेवार, वणी: पैशाने जगात सगळ्या गोष्टी खरेदी करता येतात, मात्र कार्यकर्ते विकत घेता येत नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. शुक्रवारी वणी येथील शेतकरी मंदिर येथे झालेल्या राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ‘राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा’ याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने जयंत पाटील हे कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहे. शुक्रवारी या संवाद यात्रेचा वणी दौरा होता. या दौ-यासाठी ते वणीत आले होते.

दुपारी 3 वाजता शेतकरी मंदिराच्या सभागृहात जयंत पाटील यांचे आगमन झाले. सभागृहात त्यांनी वणी विधानसभा क्षेत्रातील रा.काँ.च्या पदाधिकारी व कार्यकत्यांशी पक्षवाढीबाबत चर्चा केली. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना जयंत पाटील म्हणाले की पक्षाशी जुळल्यानंतर पक्ष वाढविण्याकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. वणी विधानसभा क्षेत्रात अनेक श्रीमंत नेते आहे. मात्र पैशाने कार्यकर्ते विकत घेता येत नाही. त्यामुळे ते अद्यापही निवडून आले नाही असा टोला त्यांनी लगावला. जर आपल्या हाकेवर शेकडो कार्यकर्ते जमा करण्याची क्षमता असेल तरच निवडून येणे शक्य आहे. निवडून येण्यासाठी जी यंत्रणा उभी करायची असते त्यासाठी पैशाची गरज असते, मात्र त्याने निवडून येऊ शकत नाही असेही जयंत पाटील म्हणाले.

पक्षश्रेष्ठीकडून मदत मिळत नसल्याची कार्यकर्त्यांची खंत
कार्यक्रमात जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना परिसरातील समस्या तसेच पक्षवाढीसाठी येणा-या समस्येबाबत काही प्रश्न विचारण्याचे आवाहन केले. यावर अनेकांनी पक्षवाढीबाबत मत मांडले. दरम्यान अनेकांनी पक्षश्रेष्ठीकडून कोणतीही मदत मिळत नसल्याची खंत व्यक्त केली.

नगरपंचायत व नगरपालिका निवडणूक स्वबळावर?
राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेची 28 जानेवारीपासून गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथून सुरुवात झाली आहे. सलग 17 दिवस विदर्भ, खानदेशातील 14 जिल्हे, 82 मतदारसंघाचा आढावा संवाद यात्रेच्या माध्यमातून घेतला जाणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढण्यास पक्ष सक्षम आहे का याची चाचपणी करण्यासाठीच हा दौरा असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आगामी नगर पंचायत व नगरपालिका निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याची चर्चा वणीच्या राजकीय वर्तुळात आहे.

या कार्यक्रमाला रुपाली चाकनकर, ख्वाजा बेग, क्रांती राऊत, महेबूब शेख, मनाली बेलारे, सुनील गव्हाणे यांच्यासह महेंद्र लोढा प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस, जयसिंग गोहोकार अध्यक्ष व वणी विधानसभा क्षेत्रातील तालुका, शहर, युवक, युवती व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

हे देखील वाचा:

सशस्त्र सेना दलात निवड झालेल्या युवक-युवतींचा प्रजासत्ताक दिनी गौरव

शोतोकोण कराटे अकॅडमी मुकुटबन तर्फे प्रजासत्ताक दिन साजरा

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.