बहुगुणी डेस्क, वणी: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नांदेपेरा येथील शाखा फलकाचे आज मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शाखा बांधणी मोहिमेला सुरुवात करण्यात आली होती. वणी विधानसभा मतदारसंघात सुमारे 200 शाखा बांधणीचं काम पूर्ण करण्यात आलं असून आज नांदेपेरा येथे पहिल्या शाखा फलकाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी डॉ. लोढा यांनी तळागाळातील नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन केले. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयसिंगजी गोहोकर, राकाँचे तालुका प्रमुख सूर्यकांत खाडे, नांदेपेरा विभाग प्रमुख दीपक निब्रड यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी अध्यक्ष म्हणून विठ्ठल धांडे, उपाध्यक्ष गजानन दुमोरे, सचिव प्रमोद नवले, कोषाध्यक्ष सागर वाटेकर तर सदस्य म्हणून कैलास घोडमारे, राजेद्र चिकटे, सुभाषराव झाडे, प्रवीण नवले, लटारी खामनकर, गोविंदा लांडगे, किशोर चिकटे, संजय चिकटे, चेतन चिकटे, पुरुषोत्तम ठावरी यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी सूर्यकांत खाडे, स्वप्निल धुर्वे, दीपक निब्रड यांनी मनोगत व्यक्त केले.
शाखा फलकाच्या उद्घाटनानंतर वाजत गाजत फटाक्यांच्या आतषबाजीत सर्व उपस्थित नांदेपेरा वनोजा रस्त्यावर पोहोचले. तिथे या रस्त्याचा लोकार्पण सोहळा पार पडला. काही दिवसांपूर्वी डॉ. लोढा यांच्या प्रयत्नातून नांदेपेरा पोहणा-राजूर (कॉलरी) या वर्षानुवर्षांपासून दुर्लक्षीत असलेल्या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले होते. याचा पुढचा टप्पा म्हणून नांदेपेरा ते वनोजा देवी या रस्त्याच्या कामाला चार दिवसांपूर्वी सुरूवात झाली होती. या रस्त्याचे डॉ. लोढा यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. हा रस्ता भाविकांना वनोजा देवी येथील सुप्रसिद्ध मंदिरात जाण्यासाठी सोयीचा ठरणार आहे.
अजित पवार, धनंजय मुंडे, जयंत पाटील येणार वणीत
आज नांदेपेरा येथील शाखा उद्घाटनाने डॉ. लोढा यांच्या नेतृत्त्वात पहिल्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून गाव पिंजून, तिथल्या समस्या जाणून मतदारसंघ बांधणीवर डॉ. लोढा यांनी लक्ष केंद्रीत केले होते. आज गावोगावी सुमारे 200 शाखा बांधल्या गेल्या. नांदेपेरापासून सुरू झालेली शाखा फलक उद्घाटनाची मोहीम यापुढे सुरूच राहिल. सर्वात शेवटच्या शाखा उद्घाटनाला वणीत अजित पवार, धनंजय मुंडे आणि जयंत पवार येणार अशी माहिती डॉ. लोढा यांनी ‘वणी बहुगुणी’ला दिली.
कार्यक्रमाच्या वेळी राजाभाऊ बिलोरिया, प्रभाकर मानकर, संजय जंबे, महेश पिदूरकर, संदिप धवणे, अंकुश नेहारे, अंकुश मापूर, स्वप्निल धुर्वे, सिराज सिद्दीकी, भारत मत्ते, मारोती मोहाडे, राऊत, नितीन गोडे, राजू उपरकर, अशोक उपरे, रवि येमुर्ले यांच्यासह वणी आणि नांदेपेरा परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते. सामाजिक कार्याद्वारे जनसामान्यांच्या मनामध्ये ठसा उमटवल्यानंतर आता डॉ. लोढा यांनी संपूर्ण लक्ष पक्ष बांधणीकडे केंद्रीत केले आहे. सुमारे 200 शाखा बांधणीचे काम पूर्ण झाले असून तेथील कार्यकर्त्यांना लोकांचे प्रश्न जाणून घेऊन ते सोडवण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे.