जीवनदायिनी निर्गुडा नदीने गाठला तळ

वणी शहरावर पाणी टंचाईचे घोंगावतेय संकट !

0

विलास ताजने, वणी: वणी शहराची तहान भागविणाऱ्या निर्गुडा नदीने नोव्हेंबरमध्ये तळ गाठला आहे. परिणामी गत वर्षी प्रमाणे शहरावर याहीवर्षी पाणी टंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वणी शहराची लोकसंख्या अंदाजे ६५ हजारांच्या जवळपास आहे. शहराची पाणीपुरवठा योजना १९५८ मध्ये सुरू झाली. तेंव्हा पासून आजतागायत निर्गुडा वणी शहराची तहान भागवित आहे. मात्र दिवसेंदिवस कमी पडणारा पाऊस, पाण्याचा होणारा उपसा आणि नदी पात्रात संचयित झालेला गाळ  यामुळे ऐन हिवाळ्यात नदीचा प्रवाह बंद पडत आहे.

वणी शहराला पाणी  पुरवठा करण्यासाठी सहा लाख ७५ हजार लिटर आणि ११ लाख २५ हजार ३०० लिटर मर्यादा असलेल्या दोन टाक्या आहे. तसेच जवळपास २० ते २५ ट्यूबवेल द्वारा पाणी पुरवठा केला जातो. परंतु नदीचा प्रवाह बंद पडल्यास नवरगाव धरणातून पाणी आरक्षित करून पाणी पुरवठा केला जातो.

गत वर्षी १५ कोटी रुपयांची वर्धा नदीवरून पाईपलाईन द्वारा पाणी पुरवठा योजना आखली. सदर कामाला सुरुवात होऊन चाचणी झाली होती. मात्र पावसाळ्यातील पुरामुळे नदीवरील मोटारपंप वाहून गेले किंवा गाळात फसले. पाणी पुरवठा करण्यासाठी टाकलेले पाईप काही ठिकाणी उघडे पडले. सदर योजनेची दुरुस्ती करून पाणी समस्या दूर करण्याची गरज निर्माण झाली आहे.

वणीकरांनी चिंता करू नये 

निर्गुडा नदी जरी तळ गाठत असली तरी जनतेला कोणत्याही समस्येला समोरं जावं लागणार नाही यासाठी आम्ही आधीपासूनच नियोजन केले आहे. वर्धा नदीवरील कायमस्वरूपी पाणी पूरवठा योजना त्वरित सुरू होणार आहे. त्यामुळे वणीकर जनतेनी पाणी टंचाई बद्दल चिंता करू नये. वणीकरांच्या प्राथमिक समस्या सोडविण्यासाठी  प्राधान्य दिल्या जात आहे.
– नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे.

Leave A Reply

Your email address will not be published.