बहुगुणी डेस्क, वणी: शाळेच्या सुट्टीत काकाकडे आलेला पुतण्या भर चौपाटीवरून बेपत्ता झाला. कायर येथे बुधवारी ही घटना घडली. कटींग करून घरी येतो असे सांगून पुतण्या कायर चौपाटीवर थांबला होता. मात्र रात्री झाली तरी तो घरी परतलाच नाही. अखेर पुतण्याला कुणीतही पळवल्याच्या संशयावरून काकाने तक्रार दिली. शिरपूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र अवघ्या 24 तासाच्या आत पोलिसांनी त्याचा शोध घेतला.
तक्रारीनुसार, फिर्यादी प्रदीप बंडूजी बावीस्कर हे बाबापूर ता. वणी येथील रहिवासी आहे. त्यांचा मोठा भाऊ छ. संभाजीनगर येथे राहतो. सध्या शाळेला सुट्ट्या असल्याने छ. संभाजीनगर येथे राहणारा प्रदीप यांचा 14 वर्षीय पुतण्या पवन हा बाबापूर येथे आला होता. गेल्या दोन महिन्यांपासून तो काकाकडेच राहत होता. मंगळवारी दिनांक 10 जून रोजी प्रदीप हे कायर येथे गेले होते. दु. दीड वाजताच्या सुमारास ते तिथल्या चौपाटीवर कॅरम खेळत होते. तिथे त्यांचा पुतण्या आला. तो देखील तिथे कॅरम खेळला. दरम्यान त्यांनी काकाला तुम्ही घरी निघा मी कटिंग करून येतो असे सांगितले.
याआधीही पुतण्या दोन-तीनदा कायरहून बाबापूर येथे एकटा आला आहे. त्यामुळे काकाने याला हरकत घेतली नाही. संध्याकाळी त्याच्या आईचा प्रदीप यांना कॉल आला की पवन अद्याप घरी आला नाही. त्यामुळे त्यांनी पुतण्याचा कायर बस स्टॉप, हुडकेश्वर इत्यादी ठिकाणी शोध घेतला. मात्र तो आढळला नाही. त्यांनी नातेवाईकांकडे देखील फोन करून विचारणा केली. मात्र त्याचा शोध लागू शकला नाही.
अखेर प्रदीप यांना त्यांच्या पुतण्याला कुणीतरी पळवून नेल्याचा संशय आला. त्यामुळे त्यांनी शिरपूर पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सूत्रे हलवली असता त्यांना सदर मुलगा वरोरा येथे नातेवाईकांकडे असल्याचे कळले. पोलिसांनी सदर मुलाला ताब्यात घेतले. मुलाला विचारणा केली असता. छ. संभाजीनगर येथील शाळेत अॅडमिशन करत असल्याने मुलगा रागातून वरोरा येथे निघून गेल्याचे कळले. मुलाला काकाच्या ताब्यात देण्यात आले आहे.
RN सोलर सिस्टीमचे गोडावून स्थानांतरण, आता हनुमान मंदिराजवळ जैन ले आउट येथे साधा संपर्क



Comments are closed.