सुनील इंदुवामन ठाकरे, नागपूर: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार प्रत्येक विषयात शेवटी वस्तुनिष्ठ प्रश्नांचा समावेश करण्यात आलेला आहे .संस्कृत विषयाच्या अभ्यासक्रम मंडळाने या वस्तुनिष्ठ प्रश्नावली करिता पुढे जाऊन नेटच्या परीक्षेत विद्यार्थी वर्गाला उपयोगी पडेल अशा रीतीने अभ्यासक्रमाची संरचना केली.
गतवर्षी पासून सुरू झालेल्या सत्र पद्धतीनुसार मागील वर्षी रामायण आणि महाभारत प्रश्नावली असा अभ्यासक्रम नियोजित करून द्वितीय वर्षासाठी यावर्षीपासून संस्कृत काव्य प्रश्नावली आणि अंतिम वर्षासाठी पुढील वर्षापासून संस्कृत नाट्य प्रश्नावली अशी अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे.
यानुसार ऋचा प्रकाशन नागपूरद्वारे प्रकाशित विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड यांनी संकलित केलेले काव्य नाट्य प्रश्नावली हे छोटेखानी पुस्तक संस्कृतच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
काव्य आणि नाट्य या विषयांवर प्रत्येकी 200 अशा वस्तुनिष्ठ संस्कृत भाषेतील प्रश्न आणि त्यांची उत्तरे असे या संकलनाचे स्वरूप आहे. संस्कृत आवश्यक या प्रश्नपत्रासह संस्कृत साहित्य या प्रश्न पत्रात सुद्धा विविध कवींची माहिती विचारली जाते त्यासाठीही हे संकलन अत्यंत उपयुक्त आहे.
संस्कृत भाषेचा अफाट आवाका आणि त्यात निर्माण झालेले अनेकानेक ग्रंथ व त्यांची वैशिष्ट्ये यांचा यात अत्यंत सुलभ समावेश असल्याने संस्कृत प्रेमी सामान्य जनतेसाठीदेखील ही पुस्तिका संग्राह्य रूपात उपयुक्त आहे. हे पुस्तक ऋचा प्रकाशनच्या गजानन कार्यालयात नागपूरला मिळेल. पुस्तकासाठी 0712-2251878 या नंबरवर संपर्क साधता येईल, अशी विनंती लेखक डॉ. पुंड यांनी केली आहे. अधिक व अन्य माहितीसाठी लेखकाशी 9822644611 या नंबरवर बोलता येईल.