एकाच घराच्या भाड्याचा घेतात नवरा-बायको दोघेही शासकीय लाभ
नाना पटोलेंना 'लढा शेतकरी हक्काचा' ने दिले निवेदन
विवेक तोटेवार, वणी: एकाच घरात राहणाऱ्या सरकारी नोकरीतील पती-पत्नी दोघांनाही घरभाड्याचा लाभ मिळतो. लढा शेतकरी हक्काचा संघटनेने ही बाब एका पत्राद्वारे विधानसभा अध्यक्षांच्या लक्षात आणून दिली. केंद्र व राज्य सरकारच्या बदली धोरणाचा लाभ शासकीय नोकरी करणाऱ्या पती-पत्नींना मिळतो. त्यात हा भाड्याचा डबल लाभ दोघंही घेतात. असा आरोप करत ‘लढा शेतकरी हक्काचा’ तर्फे नाना पटोले यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.
खरे पाहता शासकीय नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासनाकडून घरभाडे मिळते. पती-पत्नी हे दोघेही एकत्र राहून स्वतंत्र घर भाडे उचलतात. हा शासकीय निधीचा अपव्यय आहे. त्यामुळे घरभाड्याचा लाभ पत्नी किंवा पती यातील केवळ एकालाच द्यावा. त्यांना यात कसलीही सूट देऊ नये. अशी मागणी पत्रकाद्वारे करण्यात आली.
लढा शेतकरी हक्काचा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रुद्रा कुचनकर, देवराव धांडे, सुनील नांदेकर, रवींद्र पोटे, अशोक चिकटे, विलास मोवाडे, प्रा. टीकाराम कोंगरे, प्रशांत गोहोकार, दिलीप काकडे, धीरज डाहुले, उदय रायपुरे, अमित तिवारी, देवा बोबडे, बंडू पारखी, शांताराम राजूरकर आणि तुळशीराम कुमरे यांची नावं या निवेदनात आहेत.