मनसे नेते राजू उंबरकर यांना मातृशोक, सुनंदा उंबरकर यांचे निधन

वणीच्या राजकीय-सामाजिक क्षेत्रावर शोककळा, गुरुवारी अंत्ययात्रा

बहुगुणी डेस्क, वणी: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांच्या मातोश्री श्रीमती सुनंदा मधुकरराव उंबरकर यांचे आज, गुरुवार, १६ ऑक्टोबर २०२५ रोजी दुःखद निधन झाले. त्या ८५ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने उंबरकर कुटुंबावर तसेच वणीच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

स्वर्गीय सुनंदा उंबरकर या मनसे नेते राजू उंबरकर यांच्या आधारस्तंभ होत्या. त्यांच्या आशीर्वादानेच राजू उंबरकर यांनी राजकारणात मोठे स्थान प्राप्त केले. वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने उंबरकर परिवार पोरका झाला असून, त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. श्रीमती सुनंदाताई उंबरकर यांची अंत्ययात्रा उद्या दि.१७ रोजी सकाळी १० वाजता प्रविण उंबरकर,नांदेपेरा रोड यांचे राहते घरुन निघेल.

▪️ असे आहे उंबरकर कुटुंब
स्वर्गीय सुनंदा मधुकरराव उंबरकर यांच्या पश्चात दोन मुले आणि दोन मुली असा मोठा आप्त परिवार आहे. मोठे पुत्र प्रवीण उंबरकर हे शासकीय कंत्राटदार आहेत तर लहान राजू उंबरकर हे मनसेचे निष्ठावान आणि नावलौकिक नेते म्हणून ओळख प्राप्त आहे. याशिवाय दोन मुली व त्यांना नातवंड आणि मोठा आप्त परिवार आहे. वणीच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात उंबरकर कुटुंबाचे मोठे योगदान आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

▪️शोकाकुल वातावरणात सांत्वनासाठी गर्दी
राजू उंबरकर यांच्यावर आईच्या निधनाने मोठे संकट आले आहे. त्यांच्या सामाजिक आणि राजकीय प्रवासात आईचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन होते. आईच्या अचानक जाण्याने त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला मोठी भावनिक पोकळी निर्माण झाली आहे. या दुःखद प्रसंगी, अनेक राजकीय नेते, कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिकांनी उंबरकर कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले आहे. वणी शहरात एकंदर शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे.

Comments are closed.