मारेगावमध्ये जुन्या वादातून युवकावर लाकडी काठीने हल्ला
महेंद्र जैन यालाही मारहाण; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
बहुगुणी डेस्क, वणी: जुन्या वादातून मारेगाव बस स्टॅण्डजवळ एका युवकावर लाकडी काठीने प्राणघातक हल्ला करण्यात आला. ही घटना 12 ऑक्टोबर रोजी रात्री सातच्या सुमारास घडली असून, जखमी युवकाने 14ऑक्टोबर रोजी मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, शंकर सूर्यभान कुचनकार (वय 30, रा. सुभाष नगर, मारेगाव) असे जखमी युवकाचे नाव असून, तो रोजंदारीवर मजुरीचे काम करतो. कामावरून घरी जात असताना अंकुश रमेश मंजुळकर (वय 32, रा. टावर जळळ, मारेगाव) याने जुन्या भांडणाच्या कारणावरून शंकरच्या डोक्याच्या उजव्या बाजूला, कपाळावर, नाकावर, डाव्या पायावर आणि मनगटावर लाकडी काठीने मारहाण केली. या हल्ल्यामुळे शंकर घटनास्थळी बेशुद्ध पडला.
त्याचवेळी शंकरसोबत काम करणारा महेंद्र पन्नालाल जैन (रा. ग्वालियर, ह.मु. मारेगाव) याने हस्तक्षेप केला असता त्यालाही शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. नंतर महेंद्र आणि विशाल डोंगरे यांनी शंकरला मारेगावच्या सरकारी रुग्णालयात दाखल केले. मात्र गंभीर प्रकृतीमुळे त्याला चंद्रपूर आणि नंतर नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये रेफर करण्यात आले. डॉक्टरांनी डोक्याचे ऑपरेशन सुचवले, पण संभाव्य धोका लक्षात घेता शंकरने ऑपरेशन न करण्याचा निर्णय घेतला.
या प्रकरणी आरोपी अंकुश मंजुळकरविरुद्ध भारतीय दंड संहिता (बीएनएस) कलम 115(2), 118(2), 352 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहेत.



Comments are closed.