राजू उंबरकर यांना खंडणी प्रकरणात अंतरिम जामीन

उंबरकर यांना तात्पुरता दिलासा

बहुगुणी डेस्क, वणी: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांना उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून खंडणी आणि मारहाण प्रकरणात महत्त्वपूर्ण अंतरिम जामीन मंजूर झाला आहे. या निर्णयामुळे उंबरकर यांना तात्पुरता दिलासा मिळाला असून, आता पुढील कायदेशीर लढ्याची तयारी सुरू झाली आहे.
वणी परिसरातील शिबला ते पारवा रस्त्याच्या कामात अवैध गौण खनिजाचा वापर आणि निकृष्ट दर्जा असल्याची तक्रार राजू उंबरकर यांनी केली होती. त्यांनी तोंडी तसेच लेखी स्वरूपात संबंधित विभागाकडे तक्रारी नोंदवल्यानंतर झरी येथील तहसीलदारांनी तत्काळ कारवाई करत खदानी बंद केल्या. संबंधित विभागाकडून चौकशी आणि कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.
या तक्रारीनंतर चंद्रपूरचे कंत्राटदार योगेश मामीडवार यांनी उंबरकर यांच्यावर गंभीर आरोप करत, त्यांनी मजुरांना मारहाण केली आणि कामाच्या मोबदल्यात १० लाख रुपयांची खंडणी तसेच ४.५ टक्के हिस्सा (अंदाजे ९.५ कोटी रुपये) मागितल्याचा दावा केला. या आरोपांवरून १८ आणि २४ सप्टेंबर रोजी वणी पोलीस स्टेशनमध्ये दोन तक्रारी दाखल करण्यात आल्या.
न्यायालयात जोरदार युक्तिवाद
केळापूर येथील सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीत ॲड. अनिल मार्डीकर यांनी तर ॲड. भावे आणि ॲड. इम्रान देशमुख यांनी उंबरकर यांच्यावतीने नागपूर येथे प्रभावी युक्तिवाद केला. फिर्यादी पक्षातर्फे शासकीय वकीलांनीही जोरदार बाजू मांडली. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद आणि उपलब्ध पुरावे विचारात घेऊन न्यायालयाने उंबरकर यांना अंतरिम जामीन मंजूर केला.

तात्पुरता दिलासा, अंतिम लढाई बाकी
अंतरिम जामीनामुळे राजू उंबरकर यांना तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी, खटल्याची पुढील सुनावणी आणि तपास प्रक्रिया सुरूच राहणार आहे. वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोपाल उंबरकर या प्रकरणाचा तपास करत आहेत. निकृष्ट कामाच्या तक्रारी आणि खंडणीच्या आरोपांनी गाजलेल्या या प्रकरणाच्या अंतिम निकालाकडे संपूर्ण राजकीय आणि कायदेशीर क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

Comments are closed.