लोकशाहीची हुकूमशाहीविरूद्ध लढाई सुरू – प्रतिभा धानोरकर

खाती चौकात प्रचार कार्यालयाचे उद्घाटन, शेतकरी मंदिरात सभा

बहुगुणी डेस्क, वणी: स्थानिक खाती चौकात महाविकास आघाडीच्या लोकसभा प्रचार कार्यालयाचे उद्घाटन झाले. त्यानंतर शेतकरी मंदिर येथे सभा झाली. यावेळी उमेदवार प्रतिभा धानोरकर आणि मित्रपक्षांच्या नेत्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. प्रतिभा धानोरकर यावेळी म्हणाल्या की, बाळूभाऊ धानोरकर यांनी केलेलं कार्य मला पुढे न्यायचं आहे. विरोधी उमेदवारांच्या चेहऱ्यावर आतापासूनच बारा वाजलेले आहेत, असंही त्या म्हणाल्या. यावेळी मंचावर माजी आमदार वामनराव कासावार, विश्वास नांदेकर, सुभाष धोटे, अनिल हेपट, कुमार मोहरमपुरी, अजय धोबे आणि मित्रपक्षाचे नेते उपस्थित होते.

यावेळी धानोरकर यांनी उपस्थितांना भावनिक आवाहन केलं. त्यांचा आतापर्यंतचा संघर्ष मांडला. ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची निवडणूक आहे. बेरोजगारांची संख्या वाढतीच आहे. दिवे लावून पोटाची भूक भागत नाही. त्यासाठी हाताला रोजगार पाहिजे. विकास आणि प्रगती दोन्ही स्पष्ट दिसली पाहिजे .मी आमदार म्हणून साडेचार वर्षांपासून मेहनत घेत आहे. कोविड काळातही आम्ही प्रचंड सेवा दिली. अनेक कोपरखळ्या त्यानी मारल्या. माझी नाळ जनतेशी जुळलेली आहे.

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार वामनराव कासावार यांनी लोकशाहीचा मुद्दा उचलून धरला. ते म्हणाले की, लोकशाहीच्या नावावर चालणारी ही हुकुमशाही थांबली पाहिजे. आमदार सुभाष धोटे यांनी धानोरकर यांच्या कार्याचा आढावा घेतला. त्या लढवय्या नेत्या आहेत. त्या सतत विकासकामात सक्रिय राहतात असंही ते म्हणाले. माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांचा आढावा घेतला. ते म्हणाले की याचा गैरवापर होतोय. तो टाळला पाहिजे.

अनिल हेपट यांनी म्हटलं की सध्याची भांडवलशाही उद्धवस्त झाली पाहिजे. हे सरकार अदानी-अंबानीचे आहे. ते सर्वसामान्यांचे झाले पाहिजे. संभाजी ब्रिगेडचे अजय धोबे यांनीदेखील विकासावरच भाष्य केलं. सर्वांचा विकास झाला पाहिजे. कोणावरही अन्याय होता कामा नये असंही ते म्हणाले. यावेळी मोठ्या संख्येनं पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments are closed.