पूल पार करताना निर्गुडा नदीत इसम गेला वाहून
नगर पालिकेच्या कर्मचा-यांनी वाचवला जीव, रात्रभर इसम पाण्यात...
बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील निर्गुडा नदीचा पूल पार करताना पुराच्या पाण्यात सुकणेगाव येथील एक इसम वाहून गेला. मात्र काही अंतरावर हाती एका झाडाची फांदी लागल्याने त्यांचा जीव वाचला. सकाळी नगर पालिकेच्या कर्मचा-यांना याबाबत माहिती मिळाली. त्यांनी अथक परिश्रमाने त्यांना बाहेर काढले. वाहून गेलेला इसम तब्बल 8 ते 9 तास पाण्यातच होता. नशिब बलवत्तर म्हणून जीव वाचला याची प्रचिती या इसमाला आली.
प्राप्त माहितीनुसार, कवडू पुसाम (अंदाजे 60) हे सुकणेगाव येथील रहिवासी आहे. ते वाजंत्री काम करतात. सोमवारी ते वाजंत्री कामासाठी वणी येथे आले होते. रात्री काम संपल्यानंतर ते सुकणेगावला परत जात होते. जसजशी रात्री होत गेली तसतसे निर्गुडा नदीच्या सतिघाट पुलावर पाणी वाढू लागले. रात्री 10 वाजताच्या सुमारास कवडू हे हा पूल पार करण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र तो पर्यंत पाण्याचा प्रवाह वाढला होता. दरम्यान पूल पार करताना ते प्रवाहाच्या वेगाने घसरून पाण्यात पडले.
ते नदीच्या प्रवाहासोबत वाहून जाऊ लागले. काही अंतरावर नदीपात्रातील एक फांदी त्यांच्या हाती लागली. प्रसंगावधान राखत त्याने रात्रभर झाडाची फांदी घट्ट पकडून ठेवली. दरम्यान सकाळी काही लोक नदी काठी गेले असता त्यांना कवडू हे फांदी पकडलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांनी याची माहिती नजिकच सेवा नगर येथे राहत असलेल्या नगरपालिकेच्या कर्मचा-यांना दिली. कर्मचारी कुंदन तोमस्कर आणि सुरेश तंबोली यांनी रेक्यु केले. यांनी घटनास्थळी धाव घेतली व अथक परिश्रमाने त्यांना रेस्क्यू केले.

तब्बल आठ नऊ तासांनंतर कवडू पाण्यातच होते. या कामगिरीमुळे नगर पालिकेच्या कर्मचा-यांचे कौतुक होत आहे. सध्या वणी परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे पावसामुळे नदी नाल्यांना पुर आलेला असताना नागरिकांनी पुराच्या पाण्यातून जिव धोक्यात घालून जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.




Comments are closed.