वेकोलि खाणीची ओबी कोसळली, कार व ट्रक आले मातीच्या ढिगा-याखाली
वेकोलि प्रशासनाचा निष्काळजीपणा.... उकणी येथील 4 तरुण थोडक्यात बचावले...
बहुगुणी डेस्क, वणी: निलजई खाण परिसरात मातीचा ढिगारा कोसळला. या अपघातात एक स्कॉर्पिओ गाडी व एक ट्रक अर्धाअधिक मातीत बुजला. मात्र प्रसंगवधान राखल्याने गाडीतील चार युवकांचा जीव वाचला. सोमवारी रात्री साडेसात वाजताच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच सकाळी वेकोलि सुरक्षा समिती सदस्य (टीएससी) संजय खाडे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी वेकोलि अधिका-यांना चांगलेच धारेवर धरले. जर वेकोलि प्रशासन कामगार व स्थानिक रहिवाशांच्या जिवाशी खेळत असेल, तर प्रसंगी कोळसा खाण देखील बंद पाडू असा इशारा त्यांनी दिला.
प्राप्त माहितीनुसार, उकणी येथील चार तरुण हे कामानिमित्त सोमवारी दिनांक 1 सप्टेंबर रोजी स्कॉर्पिओ (MH29 AD 2965) या गाडीने चंद्रपूर येथे गेले होते. संध्याकाळी ते चंद्रपूरहून गावी परतत होते. दरम्यान निलजई परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु होता. निलजई ओपन कास्ट माईन्स रोडवरील काटा घराजवळील अंडरपास येथे पिवळ्या मातीचे मोठे ढिगारे (ओबी) आहे. या लगतच्या रस्त्यावरून गाडीने जाताना अचानक मातीचा ढिगारा खाली कोसळला. यामुळे अर्धिअधिक गाडी बुजली गेली. तर जवळच असलेला ट्रक देखील अर्धा अर्धाअधिक मातीखाली आला.
मातीचा ढिगारा कोसळताच प्रसंगवधान राखून गाडीतील सर्व तरुण तात्काळ बाहेर आले. त्यामुळे त्यांचा जीव वाचला. त्यांनी तातडीने याची माहिती गावातील लोकांना व संजय खाडे यांना दिली. घटनेची माहिती मिळताच संजय खाडे यांनी मंगळवारी सकाळी 8 वाजताच्या दरम्यान घटनास्थळी भेट दिली. दुर्घटनेची माहिती मिळताच वेकोलि प्रशासन देखील कामाला लागले होते. यावेळी संजय खाडे यांनी वेकोलि अधिका-यांना चांगलेच धारेवर धरले. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात उकणी येथे झालेल्या चक्का जाम आंदोलनात ओबीच्या समस्येचा मुद्दा त्यांनी उचलला होता.
अन्यथा खाण बंद पाडू – संजय खाडे
सदर दुर्घटना ही वेकोलि प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनामुळे झाली आहे. सुदैवाने यात जीवितहानी टळली, पण गाडी मालकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना नुकसान भरपाई मिळायला पाहिजे. वेकोलि संबंधीत विविध मागण्यांसाठी वेळोवेळी पत्रव्यवहार आणि आंदोलन केले, तरी वेकोलि प्रशासन सातत्याने दुर्लक्ष करीत आहे ! कामगार आणि स्थानिकांची सुरक्षेला वेकोलिचे प्राधान्य असले पाहिजे. जर वेकोलि नियमांचे पालन करीत नसेल तर प्रसंगी खाण देखील बंद पाडली जाईल. – संजय खाडे, वेकोलि टीएससी सदस्य (HMS KSS युनियन)
दुपारपासून जेसीबी लावून मातीचा ढिगारा बाजूला सारून गाडी बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु होता. अथक परिश्रमानंतर स्कॉर्पिओ गाडी बाहेर काढण्यात यश आले. मात्र संध्याकाळ ट्रक बाहेर काढण्यात आला नव्हता व सदर मार्ग मोकळा झाला नव्हता. या दुर्घटनेमुळे स्थानिकांमध्ये वेकोलि प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे.



Comments are closed.