कृषिप्रधान देशात पोळ्याच्या सुट्टी पासून विद्यार्थी वंचित
अनेक कमी महत्त्वाच्या सणांना दिली जाते सुट्टी, सुट्टी जाहीर करण्याची मागणी
विलास ताजने, शिंदोला: जगाच्या पाठीवर भारताची ओळख ही कृषीप्रधान देश म्हणून आहे. महाराष्ट्रातही लोकांचा प्रमुख व्यवसाय हा शेती आहे. अनादी काळापासून महाराष्ट्रात बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याासाठी पोळा हा सण आहे. मात्र शेतकऱ्यांच्या या प्रमुख सणाला शासकीय सुट्टी नसते. त्यामुळे अनेक विध्यार्थी व पालक या सणाच्या आनंदा पासून वंचित राहतात.
महाराष्ट्रात बहुतांश विभागात शेतकरी वर्ग बहुसंख्येने राहतो. वर्षंभर शेतात राबणाऱ्या बैलांचा मानपान करण्यासाठी पोळा हा सण श्रावण अमावस्येला साजरा केला जातो. पोळ्याच्या आदल्या दिवशी म्हणजे वाटबैलाच्या दिवशी बैलांना नदी,ओढयांवर धुण्यात येते. खरिपात मशागतीमुळे बैलांच्या मानेला आलेली सूज कमी करण्यासाठी तूप व हळद लावून बैलांचे खांद शेकल्या जाते. ‘आज आवतन घे, उद्या जेवाले ये ‘ म्हणून निमंत्रित केल्या जाते.
पोळ्याच्या दिवशी शिगांना बेगड, चौर, कपाळावर बेलपत्री, अंगावर रंगीत झूल टाकून सजवले जाते. पोळा भरण्याच्या ठिकाणी नेल्या जाते. पोळा फुटल्यावर वाजतगाजत मारुतीच्या पारावर नेल्या जाते. अंगावर गुढी फिरवून गोड नैवध खाऊ घातल्या जातो. या दिवशी शेतकऱ्यांचा आनंद द्विगुणीत झालेला असतो.
(हे पण वाचा: नांदेड-हावडा एक्सप्रेसला मिळाला वणी स्टॉप)
पोळ्याचा दुसरा दिवशी तान्हा पोळा असतो. या दिवशी लहान बालक लाकडी नंदीबैल सजवून मिरवणूक काढतात. एकुणच शेतकरी व त्यांच्या कुटुंबियासाठी पोळा हा सण आनंद देणारा असतो. मात्र या सणाला सरकारी सुट्टी नसल्याने नोकरदार शेतकऱ्यांना व विद्यार्थ्यांना सुट्टी काढून सण साजरा करावा लागतो.
आजपर्यंत अनेक शेतकरी पुत्र आमदार झाले. परंतु कुणालाही शेतकऱ्यांच्या सणाची खऱ्या अर्थाने जाण असल्याचे दिसून आले नाही. वर्षंभरात अनेक सणांना सुट्टी जाहीर असते. विद्यार्थी अनेक सणाबद्दल अजाण असतात. मात्र कृषिप्रधान देशात शेतकऱ्यांच्या सणाला सुट्टी नसणं ही खरोखरच खेदजनक बाब असल्याचे दिसून येते. त्यामुळे या दिवशी कलेक्टर सुट्टी जाहीर करावी अशी अपेक्षा शेतकरीवर्ग करीत आहे.