मंदर येथे रासोयाच्या 7 दिवसाच्या शिबिराची सांगता

विविध सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमाने रंगले शिबिर

विवेक तोटेवार, वणी: लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे 7 दिवसाचे निवासी शिबिर मंदर येथे पार पडले. या शिबिरात सुमारे 100 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या शिबिरात विविध बौद्धीक, सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

शिबिरात 16 जानेवारीला बॉटनी विभागाचे विभागप्रमुख डॉ. रविंद्र मत्ते यांचे बौद्धिक सत्रामध्ये ‘शेती काळाची गरज’ या विषयावर व्याख्यान झाले. त्यानंतर संध्याकाळी आकाश महादुळे व मंगेश गोहोकार या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी ‘शेतकरी आत्महत्या व व्यसनमुक्ती’ या विषयावर नाटक सादर केलं. 17 तारखेला डॉ संदीप केलोडे रसायनशास्त्र विभागप्रमुख कला व वाणिज्य महाविद्यालय मारेगाव यांनी ‘व्यक्तिमत्व विकास’ या विषयावर मार्गदर्शन केले.

18 तारखेला किशोर गज्जलवार बीडीओ यांनी ‘लोकप्रशासन’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 19 तारखेला डॉ. स्वानंद पुंड यांनी ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ या विषयावर व्याख्यान दिले. 20 तारखेला डॉ. राजू निखाडे विभागीय राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक, वर्धा यांनी ‘राष्ट्रीय सेवा योजना व आजचा युवक’ या विषयावर मार्गदर्शन केले. या सात दिवसांमध्ये महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी इत्यादींनी भेट दिली.

21 जानेवारी रोजी सकाळी गावातून प्रबोधनात्मक दिंडी काढण्यात आली. तर दुपारी 1 वाजता समारोपीय कार्यक्रमाला सुरुवात झाली. समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. मानसकुमार गुप्ता इंग्रजी विभागप्रमुख हे होते. तर मंदरच्या सरपंच वर्षा बोढे, उपसरपंच वंदना उपरे, ग्रामपंचायत सदस्य अनंतराव बोढे, वैशाली परसुटकर, शुभांगी थाटे, हेमलता पोटे, विनोद मोहितकर, शाळा व्यवस्थापन समिती, सदस्य जबीता शेख, शालिनी दर्वे तसेच जि प शाळेचे मुख्याध्यापक पि बी बोथकर व मेश्राम यांची प्रमुख उपस्थिती होती.

या सात दिवसात गावामध्ये शोषखड्डे. वृक्षलागवड, नदीवर बंधारा, ग्राम स्वच्छता या सारखे अनेक उपक्रम या शिबिराने गावामध्ये राबविले गेले. तसेच आधुनिक विचारांचा गावात प्रचार प्रसार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ गुप्ता यांनी हे शिबीर परिवर्तनाचं व्यासपीठ आहे असे मनोगत व्यक्त केले. वैष्णवी निखाडे, सरस्वती डांगे, गौरव नायनवर, करण धुरके, संजय बिलोरीया यांनीसुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे नियोजन व संचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ निलिमा दवणे व डॉ. विकास जुनगरी यांनी केले.

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!