सेवानगरातील कोरोना टेस्टवर नागरिकांचा आक्षेप
लक्षणं दिसणाऱे संशयीतही निगेटीव्ह आल्याचा आरोप
विवेक तोटेवार, वणी: स्थानिक सेवानगरात कोरोनाचा उद्रेक वाढत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून मंगळवार 29 सप्टेंबर रोजी येथील समाजमंदिरात 176 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यातील 3 जण पॉजिटीव्ह निघालेत. काही व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणं असतानाही त्यांच्या टेस्ट निगेटिव्ह आल्याचा आरोप काही नागरिकांनी केला.
ह्या सगळ्या रॅपिड एॅंटिजन टेस्ट झाल्यात. त्या सदोष असल्याचं म्हणत, काही नागरिकांनी यावर आक्षेप घेतला. निकषांनुसार टेस्ट घेण्यात आल्या नाहीत असंही स्थानिकांचं म्हणणं आहे. रॅपीड एॅंटिजन टेस्ट ऐवजी आरटीपीसीआर टेस्ट घ्यावी ही नागरिकांची मागणी आहे.
सेवानगर येथे 25 सप्टेंबरला कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. नंतर दोन दिवसांत परिवारातल्या दोघांचा मृत्यू झाला. दरम्यान परिसरातील काही कोरोनायोद्धाही पॉजिटीव्ह आलेत. सेवानगरात प्रशासनाने वाढता संसर्गं बघता रॅपीड एंटिजन टेस्टचा निर्णय घेतला.
नागरिकांचा रॅपिड टेस्टवर आक्षेप
सेवानगर परिसरात काही जण कोरोना पॉजिटीव्ह असल्याचा संशय होता. परंतु या ठिकाणी करण्यात आलेल्या टेस्टमध्ये तिघेच पॉसिटीव्ह निघाल्याने या रॅपिड किटवर येथील नागरिकांनी संशय आणि आक्षेप घेतला. काही लोकांना कोरोनाची लक्षणे होती; परंतु त्यांचा रिपोर्ट हा निगेटिव्ह आला. त्यामुळे ही रॅपिड किट संशयाच्या भोवऱ्यात असल्याचं येथील नागरिकांनी ‘वणी बहुगुणीला’ बोलून दाखवलं.
रॅपिड किट उघडयावर ठेवण्यात आल्याने कदाचित घडला असावा प्रकार
नियमानुसार रॅपिड किट शीतगृहात म्हणजेच थंड ठिकाणी ठेवणे आवश्यक आहे. परंतु या ठिकाणी किट उन्हात उघड्यावरच ठेवण्यात आल्याने किट योग्य काम करीत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या किटमुळे येथील लोकांचा योग्य रिपोर्ट मिळू शकला नाही. योग्य निकष अथवा नियमांनुसार ह्या टेस्ट झाल्या नाहीत, असंही लोकांचं म्हणणं आहे.
हाय रिस्क लोकांची आरटीपीसिआर टेस्ट करण्याची प्रशासनाला मागणी
ज्या कुटुंबातील लोकांची कोरोना चाचणी पॉजिटीव्ह आली आहे, अशा लोकांच्या घरातील सर्व सदस्यांची आरटीपीसीआर टेस्ट करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे. पॉजिटीव्ह आलेल्या लोकांच्या कुटुंबातील काही सदस्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांची आरटीपीसीआर टेस्ट करावी अशी मागणी होत आहे. आरोग्यविभागाच्या या गलथान कारभाराने जनतेच्या आरोग्यासमोर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)