हृदयद्रावक: 8 व्या माळ्यावरील गॅलरीतून कोसळून वृद्धाचा मृत्यू
शेवाळकर परिसरातील घटना.. परिसरात हळहळ.....
जितेंद्र कोठारी, वणी: पहाटे उठल्यानंतर फ्लॅटच्या गॅलरीत फिरण्यासाठी गेलेल्या एका वृद्धाचा गॅलरीतून कोसळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी 5.30 वाजताच्या सुमारास घडली. शहरातील शेवाळकर परिसरात हा अपघात झाला. प्रभाकर गोविंदराव पाथ्रडकर (69) असे मृतकाचे नाव आहे. या अपघातामुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्रभाकर हे वेकोलितील सेवानिवृत्त कर्मचारी होते. ते त्यांचा मुलगा, सुन, नातवंडांसह शहरातील यवतमाळ रोडवरील राम शेवाळकर परिसर येथील स्नेहगोत्री विंग बी या बिल्डिंगमधील 8 व्या माळ्यावरील एका फ्लॅटमध्ये राहायचे. आज शुक्रवारी दिनांक 15 एप्रिल रोजी सकाळी 5 वाजता ते उठले. त्यानंतर ते घराच्या गॅलरीत फिरण्यासाठी गेले होते. सकाळी 5.30 वाजताच्या सुमारास गॅलरीत फिरताना त्यांचा तोल गेला व ते आठव्या माळ्यावरून खाली कोसळले.
प्रभाकर हे खाली कोसळताच परिसरात असलेल्या गार्डच्या लक्षात आले. त्यांनी त्वरित याची माहिती प्रभाकर यांच्या घरी दिली. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना त्वरित रुग्णालयात आणले असता. त्यांचा जागीच कपाळमोक्ष होऊन मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
दोन वर्षापासून प्रभाकर यांचे पक्षघातामुळे चालताना बॅलन्स जात होते. ही समस्या त्यांच्या कुटुंबीयांना माहिती असल्याने ते घराच्या गॅलरी बंदच ठेवायचे. मात्र आज पहाटे ते उठल्यानंतर ते गॅलरीत गेले व हा अपघात घडला.
ही घटना माहिती होताच परिसरातील लोकांनी घटनास्थळी व दवाखान्यात एकच गर्दी केली होती. प्रभाकर हे शहरातील सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ पाथ्रटकर यांचे भाऊ आहे. प्रभाकर यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंड असा आप्त परिवार आहे. आज दुपारी 4 वाजता त्याच्या घरून अंत्ययात्रा निघणार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Comments are closed.