शुक्रवारी तहसिल कार्यालयाजवळ एक दिवशीय धरणे आंदोलन

शास्त्रीनगर व पंचशिल नगर प्रकरणी न्याय देण्याची मागणी

0

विवेक तोटेवार, वणी: शहरातील शास्त्रीनगर परिसरातील अल्पवयीन मुली बेपत्ता प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपीवर गंभीर गुन्हा दाखल करावा तसेच पंचशिल नगर येथील पीडित भगिणींना न्याय द्या या मागणीसाठी शुक्रवारी दिनांक 7 ऑगस्ट रोजी एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन तहसिल कार्यालय व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय वणी येथे सकाळी 11 वाजता सुरू होणार असून या आंदोलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून पीडितांना न्याय मिळवून देण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

वणीतील शास्त्रीनगर परिसरातून दिनांक 11 जुलै रोजी 3 मुली बेपत्ता झाल्या होत्या. त्या प्रकरणी 27 जुलै रोजी शास्त्रीनगर येथील एका आरोपी गुन्हा देखील दाखल कऱण्यात आला होता. मात्र हे प्रकरण गंभीर असतानाही पोलीस प्रशासनाने गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल न केल्याने आरोपीला तात्काळ जमानत मिळाली. या प्रकरणी पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

या प्रकरणी पंचशिलनगर येथील दोन निराधार तरुणींना रात्री पोलीस ठाण्यात चौकशीसाठी नेऊन तिथे त्यांना मारहाण व छळ करून मध्यरात्री परत पाठवल्याचा आरोप पीडित भगिणींनी केला होता. या प्रकरणी पीडित भगिणींनी यवतमाळ येथे जाऊन पोलीस अधिक्षकांची भेट घेतली. मात्र या प्रकरणी कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही असा आरोप करत या बहिणींना न्याय मिळावा अशीही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

या प्रकरणी शुक्रवारी दिनांक 7 ऑगस्ट रोजी वणीतील तहसिल कार्यालय व उपविभागीय पोलीस कार्यालय जवळ एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन सोशल डिस्टन्सिंग पाळून केले जाणार असून या आंदोलनात सहभागी होऊन पीडितांना न्याय मिळवून द्या अशी मागणी अनिल तेलंग, कॉ. अनिल घाटे, प्रवीण खानझोडे, आसिम हुसेन, रफिक शेख, रुपेश ठाकरे, शादाब अहेमद, राकेश खामनकर, गौरव जवादे, कृपाशिल तेलंग, प्रलय तेलतुंबडे यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.