मुकुटबन रोडवर अपघाताची मालिका- अडेगाव येथील तरुण गंभीर

18 नंबर पुलाजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याचा अंदाज, रविवारी मानकी येथील इसमाचा अपघातात झाला होता मृत्यू

जितेंद्र कोठारी, वणी : काम आटोपून गावाकडे जात असलेल्या युवकाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने युवक गंभीर जखमी झाला. वणी मुकुटबन राज्यमार्गावर 18 नंबर रेल्वे पुलाजवळ ही घटना सोमवार 29 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता सुमारास घडली. संदीप विठ्ठल पानघाटे (28) रा. अडेगाव, ता. झरीजामणी असे जखमी युवकाचे नाव आहे. मागील काही दिवसांपासून वणी- मुकुटबन राज्यमार्गावर अपघाताची मालिका सुरु आहे. रविवारी मानकी गावापासून काही अंतरावर झालेल्या अपघातात मानकी येथील इसम जागीच ठार झाल्याची घटना घडली होती.

प्राप्त माहितीनुसार अडेगाव येथील रहिवासी संदीप विठ्ठल पानघाटे हा तरुण काही कामानिमित्त दुचाकीने वणी येथे आला होता. काम आटोपून परत अडेगाव येथे जात असताना 18 नंबर रेल्वे पुलाच्या टर्निंगवर अज्ञात वाहनाने संदीपच्या दुचाकीला समोरून धडक दिली. या दुर्घटनेत संदीपच्या डोक्याला मार लागून तो बेशुद्ध होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला.

दरम्यान त्या मार्गावरून येत असलेले वणी येथील शिवसैनिक ललित लांजेवार यांनी पेटूर येथील नागरिकांच्या सहकार्याने ऑटोमध्ये गंभीर जखमी संदीपला वणी ग्रामीण रुग्णालयात आणून दाखल केले. मात्र परिस्थिती गंभीर असल्याने त्याला चंद्रपूर येथे रेफर करण्यात आल्याची माहिती आहे. संदीप पानघाटे हा काही दिवसांपूर्वीच मुकुटबन येथील आरसीसीपीएल कंपनीमध्ये नोकरीवर लागला होता. सहा महिन्यांपूर्वीच संदीपच्या आईचे निधन झाले होते.

रस्ता झाला दुरुस्त, पण अपघात वाढले..
नुकतेच 45 कोटीच्या निधीतून वणी कायर ते पुरड रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरण करण्यात आले आहे. या मार्गावर कोळसा व डोलोमाईटची ओव्हरलोड व जड वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरु आहे. रस्ता चकाचक झाल्यामुळे वाहनचालक भरधाव वाहन चालवून अपघाताला आमंत्रण देत आहे. मागील काही महिन्यांपासून वणी मुकुटबन मार्गावर अपघाताची अनेक घटना घडल्या आहेत.

Comments are closed.