सुशील ओझा, झरी: महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी उमरी येथील आरोपीस झरी कोर्टाने 1 वर्षाचा कठोर कारावास व 5 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. राजू विलास नगराळे (32) असे आरोपीचे नाव असून सदर घटना 5 वर्षाआधीची आहे.
सविस्तर वृत्त असे की, झरी तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत येणारी फिर्यादी महिला ही आपल्या कुटुंबासह राहते. आरोपी 2-3 वर्षांपासून महिलेचा पाठलाग करुन तिच्यावर प्रेम करतो असे म्हणायचा. सदर महिला गावाबाहेर शौचास जात असताना आरोपी हा तिचा पाठलाग करायचा. महिलेने याबाबत तिच्या पतीला कळवले. तसेच पोलीस पाटील व सरपंच यांना देखील सांगितले त्यावरून त्यांनी आरोपीस समजावले.
दिनांक 13 ऑक्टोबर 2016 रोजी पीडित महिला ही गावाच्या बाहेर शाळेकडे शौचास गेली असता आरोपी हा तिच्या मागे आला. त्यामुळे पीडिता घरी परत आली व तिने तिच्या नव-याला घडलेली घटना सांगितली. नव-याने आरोपी राजूला याबाबत जाब विचारला. त्यावर आरोपीने पीडितेच्या पतीला धक्काबुक्की करत मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. त्यावरून पीडितेने नव-यासह पोलीस स्टेशन गाठून आरोपीविरोधात रिपोर्ट दिला.
पोलिसांनी आरोपी विरूद्ध भा.दं.वि.चे कलम 354 (ड) 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला. सदर गुन्ह्याचा तपास जमादार सुरेश येलपुलवार यांनी करून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने फिर्यादी, तपास अधिकारी यांच्यासह सहा साक्षीदारांचे बयान नोंदविण्यात आले. साक्षीदाराचे बयाण ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपीस एक वर्षाचा कठोर कारावास व 5000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
सदर प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील पी. डी. कपूर व ठाणेदार संगिता हेलोंडे यांच्या मार्गदर्शनात कोर्ट पैरवी जमादार मारोती टोंगे व राठोड यांनी काम पाहिले.
हे देखील वाचा: