वणी नगर पालिकेत भ्रष्टाचार व गैर व्यवहाराबाबत चौकशीचे आदेश

गांधी चौकातील गाळे, कर्मचारी वेतन कपात, पाणीपुरवठा वसूली, सार्वजनिक शौचालय, वॉटर एटीएम इ. ची चौकशी.. माजी नगरसेवक पी. के. टोंगे यांनी केली होती तक्रार

जितेंद्र कोठारी, वणी : नगरपरिषद अंतर्गत विविध कामात झालेला भ्रष्टाचार व गैरव्यवहाराबाबत सविस्तर चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश नगरपरिषद मुख्याधिकारी याना देण्यात आले आहे. वणी नगरपरिषदचे माजी नगरसेवक पी.के. टोंगे यांच्या तक्रारीवरून जिल्हा सहआयुक्त, न.प.प्र. जिल्हा यवतमाळ धीरज गोहोड यांनी गुरुवार 15 सप्टें.रोजी आदेश काढले आहे. 

Podar School 2025

न.प. वणीतील शिट नं. 19 (अ) व 20 (ब) मधील गांधी चौक येथील दुकान गाळे हर्रास करणे, न.प. कर्मचाऱ्यांच्या वेतनातून सन 2005 पासून नियमबाह्य कपात केलेल्या आरोग्य भत्ताची चौकशी करण्याची मागणी पी.के. टोंगे यांनी केली होती.  कार्योत्तर मंजुरीचे अधिकार जिल्हाधिकारी यांना असतांना मुख्याधिकारी यांनी स्वतः सह्या करून काढलेले 1 कोटी पेक्षा जास्त रक्कमेची चौकशी करावी.  पाणी पुरवठा कराच्या स्वरूपाने वसुल झालेल्या तब्बल 37 लाख रुपयांमध्ये अफरातफर झाल्याचा आरोप टोंगे यांनी करत याबाबत चौकशीची मागणी करण्यात आली आहे. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

खनिज विकास निधी अंतर्गत वणी शहरात  1 कोटी 49 लाखाच्या निधीतून बांधलेले सार्वजनिक शौचालय, 1 कोटी 28 लाख खर्च करून लावण्यात आले  वॉटर एटीएम, 37 लाखाच्या निधीतून न.प. शाळा डिजिटलीकरणच्या कामात अनियमितता व भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे आदेशही मुख्याधिकारी याना देण्यात आले आहे. विकास आराखडा बाहेरील 42 लाखांचा रस्ता व खाजगी जागेवर बांधलेला 20 लाखाचे रस्ता व वणी न.प. हद्दवाढीबाबत बाबत नोटीफिकेशन होऊन 4 वर्षानंतरही नकाशा तयार होत नसल्याबाबतची तक्रार पी.के. टोंगे यांनी केली आहे.

शहरातील यात्रा मैदान परिसरात खाजगी व्यक्तीने केलेले अतिक्रमण, सन 2017 मध्ये आयोजित कृषी प्रदर्शनीत झालेले गैरव्यवहार व  कर्मचारी राजकुमार भगत  यांना प्रतिनियुक्तीवर दिलेले वेतन वसुलीबाबत तक्रारीची सविस्तर चौकशी करून मुद्देसूद अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहे.

आदेशाची प्रत अद्याप मिळाली नाही

माजी नगरसेवक पी.के. टोंगे यांच्या तक्रारीवरून सहआयुक्त यांनी पारित केलेल्या चौकशी आदेशाची प्रत अद्याप नगर परिषद कार्यालयास मिळाली नाही. माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी विविध कामासंदर्भात केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी सुरु आहे. 

अभिजित वायकोस – मुख्याधिकारी, न.प. वणी

Comments are closed.