अधिकारी व कर्माचाऱ्यांना मुख्यालय राहण्याचे आदेश द्या
झरी तहसील हद्दीतील सीमा सिल करण्याची मागणी
सुशील ओझा, झरी: जिल्ह्यात दारव्हा नेर महागाव येथे कोरोना रुग्णाची संख्या वाढत असतांना आता वणी येथेही कोरोनाने शिरकाव केला आहे. त्यामुळे नजिक असलेल्या झरी तालुक्यातही दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यात कोरोनाचा शिरकाव न होण्यासाठी खबरदारी म्हणून झरी तालुक्यात जे अधिकारी किंवा कर्मचारी अपडाऊऩ करतात त्यांना मुख्यालयात राहण्याचे आदेश द्या अशी मागणी करण्यात आली आहे.
झरीतील मुख्य मार्केट वणी असल्यामुळे मुकूटबन झरी पाटण मांगली लिंगटी अर्धवन मार्किं पांढरकवडा (ल) व इतर गावातून शेकडो लोक वस्तू खरेदी, दवाखाना व इतर अनेक कामाकरिता जातात. परंतु वणीत 6 कोरोना पॉजीटीव्ह सापडल्याने झरी तालुक्यातील जनतेला कोरोना संक्रमण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच यवतमाळ मध्येही कोरोनाचे रुग्ण असून काही अधिकारी व कर्मचारी यवतमाळ व वणी येथून झरी येथील शासकीय कार्यालयात ये- जा करीत आहे.
अश्या अधिकारी व कर्मचारी याना मुख्यालय राहण्याचे आदेश निर्गमित करण्यात यावे, ज्यामुळे तालुक्यातील जनतेचा कोरोनापासून धोका टळेल. तसेच वणी व यवतमाळ वरून येणाऱ्या तालुक्याच्या सर्व सीमा सील करण्यात याव्या जेणेकरून इतर तालुका व जिल्यातील लोकांचा शिरकाव होणार नाही व कोरोनाचा धोका उदभवणार नाही अश्या मागणीचे निवेदन तहसीलदार गिरीश जोशी यांना श्रीकांत अनमूलवार, राहुल दांडेकर, बंडू कडुकर, पिंटू मिलमीले, संदीप वडस्कर, निखील चौधरी, निखिल वनकर, नरेश डहाके, रवी डुकरे यांनी दिले.