पैनगंगा नदीवरील पुलासाठी 25 कोटींची मंजुरी

खातेरा ते पार्डी पुल जोडणार यवतमाळ व चंद्रपूर जिल्हा

0
सुशील ओझा, झरी : चंद्रपूर व यवतमाळ या दोन जिल्ह्यांना जोडणारा पैनगंगा नदीवरील पूल लवकरच साकारला जाणार आहे. यासाठी तब्बल २५ कोटींच्या खर्चावर शासनाने मंजुरीची मोहोर उमटविली आहे..
तालुक्यातील खातेरा गावाजवळील पैनगंगा नदीच्या पलीकडील चंद्रपूर जिल्ह्यातील पार्डी गावाला जोडणारा पूल आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला आहे. पार्डी- खातेरा घाटावरील पुलाला ना. सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थ संकल्पीय निधीतून २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यासाठी राजुराचे आ. संजय धोटे व आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी पाठपुरावा केला. पैनगंगा नदीवरील पार्डी-खातेरा घाटावर पूल निर्माण व्हावा, ही मागणी गेल्या ४० वषांर्पासून सुरू होती.
पूल निर्मितीमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना व यवतमाळ जिल्ह्यातील मुकुटबन या दोन शहराचे अंतर अतिशय कमी होणार असून, थेट प्रवासातील बऱ्याच अडचणी या माध्यमातून दूर होणार आहे. शिवाय, या परिसरातील दोन्ही भागातील जवळपास ५० ते ६० गावांना मोठी बाजारपेठ, रेल्वेस्थानक अगदी हाकेच्या अंतरावर उपलब्ध होणार आहे. यामुळे दळणवळण, कृषी, पर्यटन, औद्योगिक असा विकास साधला जाणार आहे..
विशेष म्हणजे कोरपना व मुकुटबन भागातील नागरिकांना अगदी हाकेच्या अंतरावर असताना उलट २५ किलोमीटरचा करावा लागणारा प्रवास वाचणार आहे. यातून मानसिक त्रास व आर्थिक बचत होणार असल्याचे आ. बोदकुरवार यांनी सांगितले. तसेच पार्डी गावापासून पश्चिमेस काही कि.मी. अंतरावर तेलंगणा राज्य सुद्धा असून, याचाही फायदा चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील जनतेला होणार आहे..
कोरपना तालुक्यातील नागरिकांना मुकुटबन, झरी जामणी, पांढरकवडा येथे जाण्यासाठी जवळचे अंतर पडणार आहे. सदर शहरे गाठण्यासाठी वेळाबाई मार्ग तालुक्यातील नागरिकांना जावे लागत होते. तसेच वणी व झरी जामणी तालुक्यातील नागरिकांना कोरपना, गडचांदूर, राजुरा येथे जाण्यासाठी जवळ पडणार आहे. या पुलाच्या मंजुरीमुळे दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांकडून आनंद व्यक्त होत आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.