सुशील ओझा, झरी: तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे तालुक्यातील नाले व पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. नदी व नाल्याच्या पात्राने धोक्याची पातळी गाठल्याने नदी काठावरील गावांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे तहसिल प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
धरणाचे पाणी सोडल्याने पैनगंगा नदी दुथडी वाहत आहे. दिग्रस, दुर्भा, धानोरा, हिरापूर, राजूर, खातेरा या गावांच्या काही पाणी वाहत असल्याने धोका निर्माण झाला आहे. याकरिता प्रशासन सज्ज झाले असून तहसिलदार रामचंद्र खिरेकर व मुकुटबनचे ठाणेदार धनंजय जगदाळे व पाटणचे ठाणेदार आपला ताफा घेऊन प्रत्येक गावाची पाहणी करत आहे.
सततच्या पावसामुळे नदी, नाल्याजवळील बहुतांश शेती पाण्यात बुडाली आहे. शेतीला तलावाचे रूप आले आहे यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. पावसामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून बाजारपेठही ठप्प झाल्या आहे.