विवेक तोटेवार, वणी: पंचायत समितीच्या अंतर्गत येत असलेल्या अहेरी ग्रामपंचायतीमध्ये प्रशांत कवडू बोर्डे यांनी व त्याच्या एका साथीदाराने सरपंच सचिव व गटविकास अधिकारी यांच्या खोट्या सह्या आणि शिक्के मारून जवळपास 18 लाख रुपये उचलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर रक्कम ही ॲक्सीस बँकेमधून उचलली गेली असल्याचे समजले आहे. वणीचे गटविकास अधिकारी यांच्यातर्फे विस्तार अधिकारी माया बाबुराव दिवेकर यांनी वणी पोलिसात तक्रार दिली आहे.
सविस्तर वृत्त असे की, वणी पंचायत समितीच्या अंतर्गत अहेरी हे गाव येते. येथील ग्रामसेवक डीएस गुहाडे हे 30 मे अठरा ते 30 मे 22 ऑगस्ट 2018 पर्यंत अहिरे येथे कार्यरत होते. परंतु यांची प्रकृती ठीक राहत नसल्याने पंचायत समितीमध्ये असणाऱ्या प्रशांत कवडू बोढे रा. निवली येथील तरुण काम बघत होता. दरम्यान प्रशांत याने विश्वास संपादन करून ग्रामपंचायतीचे शिक्के तयार करून घेतले. या कामात त्याचे सहकार्य लंकेश भक्तदास नरुले याने केले. यांनी ग्रामपंचायतीच्या खात्यातून खोट्या सह्या आणि शिक्के मारून बँकेतून रक्कम उचल करण्यास सुरुवात केली. यामध्ये 14 व्या वित्त आयोगाचे 31 डिसेंबर 2018 ते 26 जुलै 2019 या काळात 14 लाख 69 हजार 460 रुपये आणि सामान्य निधीतून 16 मार्च 2019 ते 21 ऑगस्ट 2019 मध्ये 2 लाख 60 हजार 694 रुपये आणि पाणी पुरवठा निधीतून 25 मार्च 2019 ते 3 जून 2019 या काळात 3 लाख 39 हजार 600 रुपये काढण्यात आले. असे एकूण 17 लाख 69 हजार 754 रुपयाची उचल केली.
या चोरट्यांनी परवानगीपत्रावर गटविकास अधिकारी राजेश गायणार यांच्या खोट्या सह्या केल्या. परंतु आश्चर्य याचे वाटते की, ही बाब बँक अधिकाऱ्यांच्या लक्षात का आली नाही.आज गुरुवारी अशाच प्रकारचे काम हे चोरटे करीत असताना काही लोकांच्या लक्षात ही बाब आली. त्यांनी प्रशांत कवडू बोढे ,लंकेश भक्तदास नरुले आणि नीलकंठ तुळशीराम आळे यांना बँकेतच पकडले व पंचायत समिती वणी येथे आणले. त्यानंतर गटविकास अधिकारी यांनी लगेच पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी या तिघांविरुद्ध कलम 420, 468, 471 व 34 नुसार गुन्हा दाखल केला. सदर घटनेचा तपास ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उ.नि. भगत करीत आहे.