परमडोहच्या शाळेची उत्तुंग भरारी
शिक्षक नीलेश सपाटेंना 'महाराष्ट्र रत्न' तर विद्यार्थी तन्मय काकडेला 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जाहीर
वि. मा. ताजने, वणी: शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य, सलाम मुंबई फाउंडेशन, सकाळ माध्यमसमूह आणि बजाज इलेक्ट्रिकल्स फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने जागतिक कर्करोगदिनी ४ फेब्रुवारीला ‘एक पत्र व्यसनमुक्तीसाठी’ हा उपक्रम राबविण्यात आला होता. यात महाराष्ट्रातील अनेक शाळा सहभागी झाल्या होत्या. यात परमडोहच्या शाळेने शिक्षक- विद्यार्थ्यांसह यश संपादन करीत पुन्हा एकदा उत्तुंग भरारी घेतली आहे.
या उपक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनात आपल्या प्रियजनांना पत्र लिहिले. त्याचा पाठपुरावा केला. यात अनेक विद्यार्थी आपल्या वडिलांना, काकांना, भाऊ तसेच अन्य प्रिय व्यक्तींना व्यसनमुक्त करण्यात यशस्वी झाले. शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची चिकाटी यामुळे हे यश मिळाले. या कार्याचा गौरव म्हणून शिक्षक नीलेश सपाटे यांना ‘महाराष्ट्र रत्न’ तर तन्मय प्रफुल काकडे या विद्यार्थ्याला ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर झाला.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५१ व्या जयंतीला (२ ऑक्टोबर) मार्गदर्शक शिक्षक आणि विद्यार्थ्याला सदर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सदर पुरस्कारासाठी यवतमाळ जिल्ह्यातील २१ शिक्षक आणि ६२ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. विशेष म्हणजे शिक्षक सपाटे यांना नुकताच २२ सप्टेंबरला सोलापूर येथे उत्कृष्ट शैक्षणिक आणि सामाजिक कार्याबद्दल ‘राज्यस्तरीय शिक्षक रत्न’ पुरस्कार मिळाला. परमडोह ग्रामस्थांनी शाळेला नावलौकिक प्राप्त करून देणाऱ्या शिक्षकाचे भरभरून कौतुक केले.