प्रशासकीय अधिकारी सुस्त अन विद्यार्थी त्रस्त

वरांड्यातच काढावा लागला शाळेचा पहिला दिवस

0
विलास ताजने, वणी: देशात एकीकडे डिजिटल इंडियाच्या बाता करीत शहराचा विकास होत आहे. मात्र त्याचवेळी महात्मा गांधींच्या विचाराचा खरा भारत विकासापासून कोसो दूर आहे. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे वणी तालुक्यातील परमडोह येथील जिल्हा परिषद शाळा. ३ जून रोजी वादळी वाऱ्यामुळे परमडोहच्या जिल्हा परिषद शाळेचे छत उडाले होते. सरपंच आणि मुख्याध्यापकांनी मागणी करूनही जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागाला जून महिना लोटूनही जाग आली नाही. परिणामी चिमुकल्या विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शाळेच्या वरांड्यात पहिला दिवस घालवावा लागला. एकीकडे विद्यार्थ्यांच्या स्वागतार्ह शाळा सज्ज झाल्या होत्या. तर त्याचवेळी परमडोहच्या चिमुरड्यांच्या चेहऱ्यावरील हास्य हरवले होते.
वणी तालुक्याला ३ जून रोजी वादळी पावसाचा फटका बसला होता. यातच परमडोहच्या जिल्हा परिषदेच्या शाळेचे छत उडाले होते. २६ जून पासून शाळा सुरू होणार त्याअनुषंगाने प्रभारी सरपंच आणि मुख्याध्यापकाने संबंधित अधिकाऱ्यांना छताची डागडुजी करण्याची मागणी केली. मात्र मस्तवाल प्रशासनाने मागणीला केराची टोपली दाखवली. बुधवारला शाळेची पहिली घंटी वाजली. विध्यार्थी नव्या जोमाने नव्या वर्गात बसण्याच्या उत्साहात शाळेत आले. मात्र शाळेची अवस्था पाहून चिमुरड्यांचीही मन खिन्न झाली.

पर्यायी व्यवस्था नसल्याने विद्यार्थ्यांना कुठं बसवावा, अशा प्रश्न मुख्याध्यापकांपुढे उभा ठाकला. शेवटी वरांड्यातच विद्यार्थ्यांना पहिला दिवस घालवावा लागला. यावेळी उन्हाचे चटके बसत असल्याने विद्यार्थ्यांना झाडाखाली आश्रय घ्यावा लागला. शाळेच्या पहिल्याच दिवशी चिमुकल्यांचे हाल पाहून मात्र पालकांचा पारा चढला होता.
शासनाने शिक्षण हक्क कायद्याचा विस्तार करीत ३ ते १८ वर्षे वयोगटातील म्हणजेच पूर्व प्राथमिक ते बारावी पर्यंत सर्वांना मोफत, सक्तीचे व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची शिफारस राष्ट्रीय शिक्षण धोरणात नुकतीच केली. मात्र स्वातंत्र्याच्या ७१ वर्षानंतरही शाळांना ना धड इमारत, ना मैदान. शौचालयाची गोष्ट तर फार दूरची. ग्रामीण भागातील शाळांची अवस्था पाहता खरोखरच आर्थिकदृष्ट्या वंचित घटकांना मोफत शिक्षण मिळेल का, असा प्रश्न साहजिकच निर्माण होतो.
Leave A Reply

Your email address will not be published.