वणी: प्रत्येक बालक हे स्वतंत्र व्यक्तिमत्वाचे असते. त्याने स्वतः संघर्ष करून निसर्गाकडून शिकावे असे अपेक्षित आहे. पण आज पालकांना मुलांसाठी वाट पहायची तयारी नाही. आजच्या छोट्या कुटुंब व्यवस्थेमुळे मुलांना मिळणारी हक्काची कूस गायब झाली. त्याजागी निर्जीव उशी आली आहे. ही बाब मुलांच्या नैसर्गिक प्रगतीला बाधा उत्पन्न करीत आहे. अशी खंत यवतमाळ येथील जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता डॉ.प्रा. प्रशांत गावंडे यांनी व्यक्त केली. ते येथील स्वा. सावरकर नगर परिषद उच्च प्राथमिक डिजिटल शाळा क्र.5 मध्ये आयोजित आई वडिलांच्या कार्यशाळेत बोलत होते.
या कार्यशाळेसाठी उस्फुर्त प्रतिसाद लाभलेल्या आई वडीलासमोर बोलतांना प्रा. गावंडे यांनी विविध चित्रफीत दाखवत ही कार्यशाळा घेतांना म्हणाले की, मदर टंग मधील एम काढला की, अदर होतो. म्हणजेच मदर टंग मध्येच अदर टंग आहे. जो बालक मदर टंग म्हणजे मातृभाषा शिकू शकणार नाही त्याला पर भाषा शिकतांना अनेक अडचणी येतात तो पोपट पंछि बनतो. आज प्रत्येक आई वडील मुलांच्या तोंडातून निघालेली प्रत्येक बाब त्वरित पूर्ण करतो. त्यामुळे मुलांमध्ये संयम निर्माण होत नाही. प्रत्येक आई आपल्या मुलाला एका दिवशी 2 ते 3 तास पर्यंत सूचना देते. त्यातील 70 टक्के सूचना नकारात्मक असतात . त्यामुळे मुलांच्या मनामध्ये नकारात्मकता निर्माण होते.
अनेक कुटुंबातील स्त्रिया समाज सेवक म्हणून समाजात वावरताना आपल्या सासू सासऱ्यांची घरी हेळसांड करतात हे आपली मुलं पाहत असतात. याचा परिणाम पुढे त्या स्त्रीला भोगावाच लागतो.आपल्याला प्रत्यक्ष कधीही न दिसणाऱ्या देवासाठी आपण स्वतंत्र कोपरा ठेवतो. पण आपल्या जिवंत मुलांसाठी घरात काहीच राहत नाही ही आपल्या समाजाची शोकांतिका आहे. प्रत्येक आई वडिलांनी मुलांसोबत सतत सवांद साधत आपल्याला आपली मुलं जे करू नये असे वाटते तसे आपल्याला आधी स्वतः वागावे लागेल असे परखड पणे येथील आई वडिलांना प्रा. प्रशांत गावंडे यांनी सांगितले.
या कार्यशाळेत वणी नगर परिषदेच्या शिक्षण सभापती रंजुताई झाडे, नगर सेविका वर्षाताई खुसपुरे, या कार्यशाळेचे आयोजक मुख्याध्यापक गजानन कासावार प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यशाळेच्या यशस्वीततेसाठी या शाळेचे मीना काशीकर, रजनी पोयाम, प्रेमदास डंभारे, अविनाश तुंबडे, गीतांजली कोंगरे यांनी परिश्रम घेतले.