‘सॉरी’ आणि ‘थँक्यू’ आनंदी जगण्यास आवश्यक – सुनील इंदुवामन
सुप्रसिद्ध निवेदक सुनील ठाकरे यांचं शाळा क्र 5 मध्ये व्यक्तिमत्व विकास शिबिर
वणी: आपण आपल्या दैनंदिन जीवनात सूक्ष्म अहंकार जोपासत असतो. हाच अहंकार आपल्या प्रगतीत अडथळा निर्माण करतोे. याच अहंकारामुळे आपण कुणाची माफी मागत नाही. कुणाला धन्यवादही देत नाहीे. आनंदी जगण्यासाठी कुणाची ‘सॉरी’ म्हणून माफी मागितली पाहिजे. आपल्याला मदत करणाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. त्यांना ‘थँक्यू’ म्हटले पाहिजे. असे प्रतिपादन कवी, गीतकार, निवेदक व प्रशिक्षक सुनील इंदुवामन ठाकरे यांनी केले. स्वातंत्र्यवीर सावरकर नगरपरिशद प्राथमिक शाळा क्र. 5द्वारा आयोजित विशेष कार्यशाळेत ते बोलत होते.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक गजानन कासावार, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष मोहसिना खान, गायक शैलेश आडपावार प्रामुख्याने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी शाळेद्वारा वर्षभर नियमित उपक्रम राबविले जातात.
पुढे बोलताना ठाकरे म्हणाले की, आपल्यापैकी असा कुणीच नाही ज्याच्या हातून चुका होत नाही. या वयात क्षमा मागणे शिकलं पाहिजे. काही हातून घडलंच तर मुळीच खोटं न बोलता आपण कबुली द्यावी. माफी मागितल्यास अनावश्यक खोटं बोलावं लागत नाही. या वयात विद्यार्थ्यांनी ही सवय लावल्यास भविष्यात त्यांच्या व्यक्तिमत्त्वात अत्यंत लक्षणीय फरक दिसून येईल. आपल्यासाठी नेहमी झटणारे आपले आई, वडील, आप्त, पालक, शिक्षक व समाजातील अशा घटकांप्रती कृतज्ञ राहावे.
विद्यार्थ्यांना कार्यशाळेत सहभागी करून घेऊन थिएटर गेम्सच्या माध्यमातून वेगळ्या पद्धतीने ठाकरे यांनी प्रशिक्षण दिले. शिक्षक शिकविताना, अभ्यास करताना लक्ष कसं द्यावं हे काही प्रात्यक्षिक खेळांद्वारे विद्यार्थ्यांना पटवून दिले. विविध खेळांच्या माध्यमांतून हसत खेळत सुनील इंदुवामन ठाकरे यांनी व्यक्तिमत्त्व विकासाच्या विविध अंगांना स्पर्श केला. विद्यार्थ्यांनी प्रबोधनासह या कार्यशाळेचा आनंद घेतला. मुख्य कार्यक्रमाचे संचालन शिक्षक प्रेमदास डंभारे, प्रास्ताविक मीना काशिकर तर आभार प्रदर्शन शिक्षक अविनाश तुंबडे यांनी केले. रजनी पोयाम, गीातांजली कोंगरे, दर्शना राजगडे यांनी कार्यशाळेची आयोजनव्यवस्था पाहिली.