पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन हुंड्यासाठी छळ

पतीसह सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल

0

सुशील ओझा, झरी: पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन हुंड्यासाठी त्रास देणारे पती, सासू सासरे व ननंद यांच्या मुकुटबन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपेंद्र अशोक गुगुलवार, अशोक गुगुलवार, शोभा अशोक गुगुलवार व ममता रामन्ना तोकलवार (रा. खापरी ता. जैनत जिल्हा अदिलाबाद तेलंगणा) असे आरोपींचे नाव असून कौटुंबिक हिंसाचारासह विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पीडितेच्या तक्रारीनुसार, पीडित अश्विनी (23) ही झरी तालुक्यातील अर्धवन येथील रहिवाशी आहे. तिचे 3 वर्षांपूर्वी उपेंद्र अशोक गुमूलवार (29) राहणार खापरी ता जैनत जिल्हा अदिलाबाद तेलंगणा याच्याशी लग्न झाले. अश्विनीच्या वडीलांनी रितीरिवाजाप्रमाणे सर्व खर्च केला. सोबतच एक मोटार सायकल, एक सोन्याची अंगठी व हुंडा म्हणून 1.5 लाख रुपये रक्कम दिली. लग्नानंतर अश्विनी खापरी येथे राहायला गेली. दरम्यान तिला सासुरवास सुरू झाला.

तिचा पती तिला रोज दारू पिऊन मारहाण करायचा. तर सासू व सासरे चारित्र्यावर संशय घेऊन शिविगाळ करायचे. अश्विनीचा पती आधी पेट्रोल पम्पावर काम करायचा. मात्र नोकरी सुटल्यानंतर त्याने पानटपरीचा व्यवसाय सुरू केला. धंद्यासाठी पैसे हवे म्हणून पती उपेंद्रने घरून 50 हजार रुपये आणण्यासाठी अश्विनीला त्रास देणे सुरू केले.

दरम्यान चार महिन्याआधी अश्विनी ही एका घरगुती कार्यक्रमासाठी माहेरी अर्धवन येथे आली. कार्यक्रम आटोपल्यानंतर अश्विनीचे वडील अश्विनीला पोहोचवण्यासाठी खापरी येथे गेले असता सासरचे मंडळी मुद्दाम घराला कुलूप लावून शेतावर गेले. यावरून त्यांच्यात भांडण झाले व सासरच्या मंडळींनी अश्विनीला घरी घेण्यास नकार दिला. तेव्हापासून ती माहेरीच राहत होती.

याबाबत पांढरकवडा येथे समुपदेशन केंद्रात पती पत्नीमध्ये समेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र हे प्रयत्न अपयशी ठरले. अखेर अश्विनीने पती उपेंद्र गुमूलवार, सासू शोभा गुमूलवार, सासरे अशोक गुमूलवार व ननंद ममता तोकलवार यांच्याविरोधात हुंड्यासाठी झळ करणे, चारित्र्यावर संशय घेऊन शारीरिक व मानसिक त्रास देणे याबाबत मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली.

पोलिसांनी भादंविच्या कलम 498 A, 504, 34 अंतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार धर्मा सोनुने यांच्या मार्गदर्शनात एएसआय शशिकांत नागरगोजे करीत आहे.

हे देखील वाचा:

आज तालुक्यात कोरोनाचे 4 रुग्ण

वणी शहरात 5 नंतर अवैध धंद्यांना ऊत

Leave A Reply

Your email address will not be published.