मुलीच्या लग्नाची पत्रिका वाटप करुन परत येताना वडिलांवर काळाचा घाला

धावत्या दुचाकीवर आदळला रोही

जितेंद्र कोठारी, वणी : मुलीच्या लग्नाला अवघ्या 20 दिवस उरले असता नातेवाईकांना लग्न पत्रिका वाटण्याचे काम सुरु होते. लग्नपत्रिका वाटप करून परत येताना मात्र काळ रस्त्यात वाट पाहत आहे याची अजिबात कल्पना त्यांना नव्हती. धावत्या दुचाकीवर रोही (वन्यप्राणी) आदळून वडिलांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना शुक्रवार 17 जून रोजी सायंकाळी घडली. शांताराम हिरामण तलांडे (58) रा. खडकडोह असे या अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार केळापूर तालुक्यातील पहापल येथील आश्रमशाळामध्ये कामाठी पदावर असलेले शांताराम तलांडे यांच्या मुलीचा 8 जुलै रोजी लग्न ठरले होते. यासाठी जवळच्या नातेवाईकांना घरी जाऊन पत्रिका देण्यासाठी शांताराम सकाळीच दुचाकीने पांढरकवडा येथून निघाले. वणी, चारगाव, कोरपना भागात दिवसभर पत्रिका वाटून तसेच लग्नाला आवर्जून या अशी विनंती करुन ते परत पांढरकवडा निघाले. वणी ते घोन्सा, शिबला पांढरकवडा मार्गावर निमणी गावपुढे सायंकाळी 6 वाजता शेतातून धावत आलेल्या रोही (वन्यप्राणी) ने त्यांचा दुचाकीला धडक दिली. रोहिच्या धडकेने शांताराम दुचाकीसह दूर फेकले गेले. डोक्यावर गंभीर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेबाबत तात्काळ मुकुटबन पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करुन मृतदेह वणी ग्रामीण रुग्णालयात पाठविले. शनिवार दुपारी 1 वाजता शवविच्छेदन नंतर प्रेत कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आले. शांताराम तलांडे यांच्या मागे पत्नी, मुलगी, दोन मुलं आहे. मुलीच्या लग्नाच्या काही दिवसाआधी वडिलांच्या अपघाती मृत्यूने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.