सगणापूर येथे शेतमालाला लावली अज्ञात इसमाने आग

भास्कर राऊत, मारेगाव: शेतामध्ये ढीग मारून ठेवलेल्या चण्याच्या ढिगाला अज्ञाताने आग लावून पेटवून दिले. सगणापूर येथे रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या आगीमुळे शेतकऱ्याचे सुमारे 1 लाखांचे नुकसान झाले आहे. आधी कापूस चोरी व आता शेतमालाला आग लावण्याचे प्रकार समोर आल्याने शेतकरी दहशतीत आला आहे.

वणी येथील शेतकरी विठ्ठल झोलबाजी वैद्य यांची सगणापूर शिवारात 9 एकर शेती आहे. त्यांनी त्यांच्या 3 एकर शेतामध्ये चना पिकांची पेरणी केली होती व उर्वरीत शेतात गहू आणि कपाशी या पिकांची लागवड केली होती. सध्या चना पिकाच्या कापणीला सुरूवात झाली आहे. त्यामुळे विठ्ठलराव यांनी आपल्या शेतातील चना पिक काढले आणि ते शेतातच गंजी करून ठेवले होते.

रविवारी दि. 26 फेब्रुवारीला सायंकाळी सालगडी दिवसभर शेतातील काम करुन घरी परतला. मात्र काही वेळाने या सालगड्याला शेतामध्ये काहीतरी जळत असल्याचा निरोप आला. मिळालेल्या माहितीवरून यावरून सालगडी व गावातील काही नागरिक यांनी शेताकडे धाव घेतली. तेथे जाऊन बघितले असता शेतातली चण्याची गंजी जळत असल्याचे त्यांना आढळून आले.

शेतात इलेक्ट्रिकचे काही साधन नसल्याने एखाद्या इसमाने आग लावल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या आगीत शेतकऱ्यांचे सुमारे 8 ते 10 किंटल चणा जळून खाक झाला आहे. या प्रकरणी मारेगाव येथील पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

आरोपीवर भादंविच्या कलम 435 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार राजेश पुरी यांच्या मार्गर्शनाखाली जमादार भालचंद्र मांडवकर करत आहे. शेतकरी आधीच कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ याने अडचणीत आहे. त्यातच अनेक कापूस चोरीच्या घटना उघडकीस आल्या होत्या. आता शेतमाल पेटवून देण्याची घटना समोर आल्याने शेतकरी दहशतीत आला आहे.

हे देखील वाचा: 

वणी आगारात कर्तव्यावर असलेल्या कर्मचा-याला बसची धडक

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.