ग्रामीण रुग्णालयात मोठ्या प्रमाणात डुकरांचा सुळसुळाट
रुग्णांचं आरोग्य धोक्यात, प्रशासनाचं दुर्लक्ष
वणी: गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामीण रुग्णालयात घाणीचं साम्राज्य वाढलं आहे. त्यामुळे परिसरात डुकरांचा मुक्त संचार दिसून येत आहे. या इथल्या रुग्णांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे.
ग्रामीण रुग्णालयात उपचार करणा-यांमध्ये मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील नागरिकांचा तसेच गोरगरीबांचा समावेश असतो. मात्र या गोरगरींबाच्या सेवेकडे प्रशासन दुर्लक्ष करताना दिसत आहे. साफसफाई न झाल्यानं इथं मोठ्या प्रमाणात कचरा झाला आहे. वाढलेल्या घाणीमुळे इथं डुकरांचा सुळसुळाट वाढला आहे.
इथल्या समस्येबाबत वेळोवेळी तक्रार करण्यात येते. मात्र प्रशासना याकडे दुर्लक्ष करत आहे. आता ग्रामीण रुग्णालयात मोठ्या प्रमाणात डुकरांचा संचार वाढल्यानं तिथं रुग्णांचं आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे याकडे प्रशासनानं रुग्णालय परिसरातील साफसफाईकडे लक्ष देऊन डुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता स्थानिक करत आहे.